पुणे- महाराष्ट्रामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा जो खेळ सुरु आहे त्यामध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा याबाबत सर्वच पक्षांनी एक दिवस एका बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, चंपा, टरबुज्या काय भाषा वापरता. राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हटलं तर काय बिघडलं मग आम्ही ‘उठा’(उद्धव ठाकरे), जपा(जयंत पाटील), शपा(शरद पवार) म्हटले तर चालेल का? असा सवाल करीत परंतु, आम्ही तसं म्हणणार नाही, ती आमची संस्कृती नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रक परिषदेत ते बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीच्या सार्क मधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये गेल्या वर्षापासून शाब्दिक युध्द सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करताना बऱ्याचवेळा मर्यादा ओलांडल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पाटील म्हणाले, जे चालले आहे ते बरोबर नाही. एकदा एकत्र बसून एकमेकांना काय शिव्या घालायच्या त्या घालून त्यानंतर एक आचारसंहिता बनवण्याची आवश्यकता आहे.
ईडी राज्यात करीत असलेल्या कारवाईमुळे भाजपला टार्गेट केले जात आहे. सूड उगवण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याची टीका केंद्र सरकार आणि भाजपवर केली जात आहे. भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई केली गेली नाही अशी टीकाही केली जात आहे. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, राज्यातील पोलीस खाते, आर्थिक गुन्हे अन्वेषण खाते तुमच्याच हातात आहेत. एखाद्या भाजपच्या नेत्यावर कारवाई करण्यामध्ये केंद्र सरकार मागे-पुढे पहाते असे तुम्हाला वाटत्ते तर तुम्ही त्या नेत्याच्या विरोधात पुरावे द्या. किंवा राज्याची सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्ही कारवाई करा, आम्ही घाबरत नाही. बच्चू कडू यांना ज्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी असे वाटते त्याची त्यांनी नावे ईडीला द्यावीत असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीमध्ये आणि दसरा मेळाव्यात जी भाषा वापरली तशी भाषा महाराष्ट्रातील कुठल्याही मुख्यमंत्र्याने वापरली नाही असे सांगून पाटील यांनी त्यांची भाषा त्यांना लखलाभ लाभो, करून टाका काय कारवाया करायच्या त्या, वारंवार कशाला धमक्या देता असे आव्हान त्यांनी केले.
सामनातील कार्टून बद्दल बोलताना पाटील म्हणाले, परवाच आपण संविधानदिन साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना लिहिली आहे की, त्याचा गाभा हजार वर्षे बदलला जाणार नाही. घटनेमध्ये राज्य काय असते, केंद्र काय असते, सर्वोच्च न्यायालय काय, उच्च न्यायालय काय आदी सर्व गोष्टी स्पष्ट कण्यात आल्या आहेत. मात्र, हे नुसतेच मात्र, ते केवळ आम्ही घटना आणि डॉ. आंबेडकरांना मानतो असे सांगतात. परंतु, त्यांचाच घटनेच्या गाभ्यावर विश्वास नाही. घटनेप्रमाणे निवडणुका झाल्यानंतर सरकार वेगळे आणि पक्ष वेगळा असतो. पक्षाने सरकारमध्ये हस्तक्षेप करायचा नसतो. परंतु, तुम्ही करताय करा. ज्याप्रमाणे तुम्ही अर्णब गोस्वामीला अटक केली, ठक्करला अटक केली , कंगनाचा बंगला तोडला, परंतु या देशामध्ये जोपर्यंत घटना जिवंत आहे तोपर्यंत न्यायही मिळत राहणार अशी टिप्पणी पाटील यांनी केली. घटनेने तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहे,त्यामुळे कार्टून काढा असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.