रेस कोर्स मैदानावर मोदींची महाविजय संकल्प सभा : २ लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार

Modi's Mahavijay Sankalp Sabha at Race Course ground
Modi's Mahavijay Sankalp Sabha at Race Course ground

पुणे(प्रतिनिधि)— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या २९ एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळिमकर आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून  रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. १२२ एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला २  लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत.  भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. २१ विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.

अधिक वाचा  स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची :  भाग - ३ : अयोध्येचे अध्यात्मिक महत्त्व 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह ३ हजार व्हीआयपी यासभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. २२ ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी ४ वाजून ३० मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले.

शहरात अनेक निर्बंध

दरम्यान,पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘सवाई’मध्ये कला सादर करण्याची संधी हे गुरुंचे आशीर्वाद; आनंद, उत्साहासोबतच दडपणही : पहिल्यांचा सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या भावना

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार, २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई होणार आहे.

पोलिसांचे शहरात कोबिंग ऑपरेशन..

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. पोलिसांनी ⁠शहरातील हॉटेल, लॉजेस याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कोबिंग ऑपरेशनद्वारे तपासणी केली. तसेच सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉजवर संशयस्पद राहणाऱ्या नागरिकांची पोलीस चौकशी करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love