‘कोविशिल्ड’ लस पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी: चेन्नईतील स्वयंसेवकाचा आरोप फेटाळला

आरोग्य
Spread the love

पुणे—पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया उत्पादित करीत असलेली ‘कोविशिल्ड’ ही कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी आहे असे सिरम इन्स्टिट्युटकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘कोविशिल्ड’ असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. स्वयंसेवकाचे आरोप कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे असल्याने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे,’ असे सिरमककडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड प्रतिबंधक लस टोचल्यानंतर चेन्नईतील एका व्यक्तीत गंभीर लक्षणे दिसून आल्याच्या प्रकरणी भारतीय औषध महानियंत्रक व संस्थात्मक नैतिकता समिती चौकशी करीत आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एसआयआय)ने तयार केलेल्या कोविशिल्ड लशीचा डोस घेतलेल्या चेन्नईतील चाळीस वर्षीय उद्योग सल्लागार स्वयंसेवकात मेंदू आजाराची गंभीर लक्षणे दिसून आली, आहेत, असे या स्वयंसेवकाने संबंधित संस्थांना जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत हा प्रकार झाला असून या व्यक्तीने पाच कोटी रुपये भरपाई मागितली आहे. या स्वयंसेवकाला मेंदूविषयक आजार व मानसिक आजाराची गंभीर लक्षणे लशीचा डोस घेतल्यानंतर आढळून आली आहेत. त्याला चेन्नई येथील श्री रामचंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत १ ऑक्टोबरला लस देण्यात आली होती. स्वयंसेवकाच्या कायदेशीर सल्लागाराने भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला नोटीस दिली असून त्यात भारताचे महाऔषध नियंत्रक, केंद्रीय औषध नियंत्रण संस्था, अ‍ॅस्ट्राझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्सफर्ड लस चाचणी उपक्रमाचे प्रमुख संशोधक अँड्रय़ू पोलार्ड, श्रीरामचंद्र हायर एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेचे कुलगुरू यांनाही प्रतिवादी केले आहे. या स्वयंसेवकाने ५ कोटी रुपये भरपाई मागितली असून लस चाचण्या, उत्पादन व वितरण यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र, सिरमने हे आरोप फेटाळले आहेत.

‘कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकासोबत घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण लसीमुळे हा प्रकार झालेला नाही. त्यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभुती आहे. चाचणीसाठी सर्व आवश्यक नियम, नैतिक प्रक्रिया आणि नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. ही घटना लसीच्या चाचणीशी संबंधित नसल्याचे संबंधित नियामक संस्थांनी स्पष्ट केले आहे. या घटनेशी संबंधित सर्व माहिती भारतीय औषध महानियंत्रकांनाही दिली आहे. सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर चाचण्या सुरू ठेवल्या आहेत. लस पुर्णपणे सुरक्षित व रोगप्रतिकारक असल्याचे सिध्द झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर वापरासाठी दिली जाणार नाही, याची खात्री देत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *