पुण्यात उभारले जाणार ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’; कॅन्सर सेंटरपासून ॲनिमल हॉस्पिटलपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली

लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस

पुणे(प्रतिनिधी)–“मंगेशकर कुटुंबियांनी केवळ संगीताचीच सेवा केली नाही, तर देशप्रेम आणि समाजसेवेचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ‘लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या माध्यमातून उभारले जाणारे रुग्णालय केवळ उपचाराचे केंद्र नसून ते मानवतेच्या सेवेचे एक मंदिर ठरेल,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव केला. पुण्यातील ‘लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

लता मंगेशकर मेडीकल फाऊंडेशनच्यावतीने नांदोशी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या रुग्णालय प्रकल्पाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मंजुषा नागपुरे, मंगेशकर मेडीकल फाऊंडेशनचे अध्यक्ष पं.हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आजच्या काळात परवडणारी आरोग्य सेवा ही मोठी गरज आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयांचे व्यापारीकरण होताना दिसत असले, तरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कधीही ‘सेवेचा सौदा’ केला नाही. लाखो रुग्णांवर उपचार करताना गरीब रुग्णांचा खर्च स्वतः ट्रस्ट उचलते, ही बाब या कुटुंबाच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी फडणवीस यांनी एक अत्यंत भावूक आठवण सांगितली. अवघ्या चार दिवसांपूर्वीच आशा भोसले यांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम होईल की नाही, अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र, “माझ्या मरणाचे दुःख करू नका, आयुष्य हा एक उत्सव आहे,” असे मानणाऱ्या आशाताईंना रुग्णसेवेच्या कार्यातूनच खरी श्रद्धांजली मिळेल, हा मंगेशकर कुटुंबियांचा निर्णय अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. आशाताईंच्या सकारात्मकतेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, ९० व्या वर्षीही तीन तास कॉन्सर्ट करण्याची त्यांची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हा सर्वांसाठी आदर्श आहे.

अधिक वाचा  PMC Election 2026: आचारसंहिता कक्षाची मोठी कारवाई; ६९ लाखांची रोकड आणि शस्त्रे जप्त

या नव्या इन्स्टिट्यूटच्या स्वरूपाबद्दल माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, हे रुग्णालय ‘३६० डिग्री अप्रोच’ ठेवून उभारले जात आहे. यात केवळ सामान्य आजारांवर उपचार होणार नाहीत, तर संशोधन, पॅलिएटिव्ह केअर, मानसिक आरोग्य केंद्र, कॅन्सर सेंटर, भारतीय चिकित्सा पद्धती आणि पुनर्वसन केंद्र  अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी येथे अद्ययावत ‘ॲनिमल हॉस्पिटल’ देखील असणार आहे.

यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीने काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या. रुग्णालयाकडे येणारा रस्ता रुंद करणे आणि या परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सोडवणे ही जबाबदारी सरकार आणि महानगरपालिका पूर्ण करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, धर्मादाय संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांच्या इमारतींना द्याव्या लागणाऱ्या कमर्शियल प्रीमियममध्ये सवलत देण्याबाबत धोरणात्मक विचार केला जाईल, जेणेकरून अशा संस्थांना अधिक जोमाने समाजकार्य करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पु. ल. देशपांडे यांच्या शब्दांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत चंद्र-सूर्य आणि लता-आशा यांचा स्वर आहे, तोपर्यंत ही रुग्णसेवेची ज्योत तेवत राहील. शेवटी, डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमुळे हे कार्य अधिक वेगाने आणि उत्तम प्रकारे पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लता-आशा रुग्णालयात माणुसकीची ऊब मिळेल-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिक वाचा  कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

पुणे आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळते आहे. यापुढेही नव्या रुग्णालय प्रकल्पामुळे हजारो लोकांना जीवनदान लाभणार आहे आणि अनेक कुटुंबांचे दु:ख दूर होईल, तसेच रुग्णांची जीवन जगण्याची आशा पल्लवीत होईल. मंगेशकर कुटुंबाने गाण्यापलिकडे जाऊन राष्ट्रभक्तीच्या भावनेने सेवा कार्य केले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना माणुसकीची ऊब मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रुग्णालयात संगीतोपचाराची सुविधा निर्माण करून त्यांना लतादिदी आणि आशा भोसले यांचा स्वर ईश्वराने दिलेले आशिर्वाद असल्याने त्यांची गीते ऐकवावीत, अशी सूचना शिंदे यांनी केली.  मंगेशकर कुटुंबाच्या या सेवाकार्यास शासनाकडून सहकार्य मिळेल. लतादीदी आणि आशाताई आपल्यात नसल्या तरी त्या या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांसाठी सूरसंजीवनी बनून राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपले आणि पुढील पिढीचे संगीतविश्व लतादिदी आणि आशाताईंच्या स्वराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आशाताई मराठी अस्मितेचा मानबिंदू होत्या, त्या स्वरांची आकाशगंगा होत्या. आशा नावाच्या स्वरगंगेत सर्व मानवी भावभावना सामावल्या होत्या. आशाताईंना समाजाच्या दु:ख आणि वेदनांची जाणिव होती. त्यांना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी जीवनाचे रडगाणे न करता आनंदगाणे केले. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारने सन्मानित करण्याचा दिवस जीवनातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचे, शिंदे यावेळी म्हणाले.

सेवाकार्यात समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा- डॉ. मोहन भागवत 

निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले. निस्वार्थ बुद्धीने आपलेपणाने केलेली सेवा म्हणजे धर्म होय, असेही सरसंघचालक म्हणाले.

अधिक वाचा  अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजप २५ डिसेंबर सुशासन दिवस म्हणून साजरा करणार

लतादीदी आणि आशाताई यांच्या संवेदनेतून उमटलेल्या स्वरांचे सामर्थ्य अलौकिक असून, त्यांचे संगीत कधीही खंडित होणार नाही, अशी भावना डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, “शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींचाही जीवनावश्यक गरजांच्या यादीत समावेश करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला सुलभ व परवडणारे शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळायला हवी. शासन व प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेच; परंतु ‘हा देश माझा आहे’ या भावनेने आपणही अशा कार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे. सेवा भावातील आपलेपणा आणि चांगुलपणा म्हणजेच खरा धर्म आहे,” असे ते म्हणाले.

मिलिंद कुलकर्णी यांनी पं.हृदयनाथ मंगेशकर यांचे मनोगत सादर केले. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृती जतन करताना रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब रुग्णांची सेवा होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आशाताईंचे सुपूत्र आनंद भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात लता मंगेशकर मेडीकल फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर यांनी रुग्णालय प्रकल्पाची माहिती दिली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ४० एकर क्षेत्रात हा रुग्णालय प्रकल्प उभारण्यात येत असून तो देशातील मोठा रुग्णालय प्रकल्प असावा असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love