पुणे(प्रतिनिधी)–देशातील अवजड वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण विद्युतीकरण घडवून आणत प्रदूषणमुक्त हरित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘एनर्जी इन मोशन’ (Energy in Motion) या कंपनीचा अत्याधुनिक ईव्ही ट्रक निर्मिती प्रकल्प मावळ तालुक्यातील आंबी (जि. पुणे) येथील आरएमके (RMK) इंडस्ट्रियल पार्क ३ मध्ये सज्ज झाला आहे. या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शुभहस्ते होणार आहे. पुण्यात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मुरकुंबी यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. २ लाख चौरस फुटांच्या या संकुलातील कारखान्याची सुरुवातीची उत्पादन क्षमता दरवर्षी ५,००० ईव्ही ट्रक्सची असून, बाजारातील मागणीनुसार ती १०,००० ट्रक्सपर्यंत वाढवली जाऊ शकते.
आपल्या औद्योगिक प्रवासाचा पट मांडताना मुरकुंबी यांनी सांगितले की, वयाच्या २६ व्या वर्षी मातोश्री डॉ. विद्या मुरकुंबी यांच्यासमवेत त्यांनी ‘श्री रेणुका शुगर्स’ची स्थापना केली होती. साखर व इथेनॉल निर्मितीत देशात अग्रस्थान मिळवून ब्राझीलमध्ये विस्तार केल्यानंतर, आता हवामान बदल आणि भविष्यातील ऊर्जा सुरक्षेच्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी हरित तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सौर व पवन ऊर्जेद्वारे देशातच वीज व उपकरणे तयार करून कच्च्या तेलावरील परकीय अवलंबित्व कमी करणे हे आता आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील अवजड वाहतूक क्षेत्रातील डिझेल वापराचे अर्थशास्त्र मांडताना त्यांनी सांगितले की, देशात दरवर्षी सुमारे ३ लाख नव्या अवजड ट्रक्सची विक्री होते. सुमारे ३५ लाख रुपयांना मिळणारा एक डिझेल ट्रक आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात दीड कोटी रुपयांचे डिझेल वापरतो, ज्यामध्ये तब्बल ४ कोटी रुपयांच्या परदेशी क्रूड ऑइलची आयात अंतर्भूत असते. देशातील एकूण वाहतूक इंधनापैकी तब्बल ४० टक्के इंधन हे एकट्या ट्रक्सद्वारे वापरले जाते. त्यामुळे अवजड ट्रक्सचे विद्युतीकरण करणे हे सार्वजनिक धोरण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे.
‘एनर्जी इन मोशन’च्या संरचनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग केंद्र पुण्यात तर नेटवर्क केंद्र मुंबईत स्थापित करण्यात आले आहे. कंपनीने आतापर्यंत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, येत्या तीन वर्षांत एकूण ५,००० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये ४,००० कोटी रुपये चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी आणि १,००० कोटी रुपये मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीसाठी खर्च केले जातील. यासंदर्भात महाराष्ट्र शासनासोबत १,००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार (MoU) झाला आहे. या प्रकल्पाद्वारे केवळ उत्पादनाची जोडणीच नव्हे, तर सॉफ्टवेअर, आयटी आणि संशोधन क्षेत्रातील (R&D) दर्जेदार रोजगार निर्माण होणार आहेत.
५,००० ईव्ही ट्रक्सचे उत्पादन होणार
तळेगाव-आंबी येथील २ लाख चौरस फुटांच्या या संकुलातील कारखान्याची सुरुवातीची उत्पादन क्षमता दरवर्षी ५,००० ईव्ही ट्रक्सची असून, बाजारातील मागणीनुसार ती १०,००० ट्रक्सपर्यंत वाढवली जाऊ शकते. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे जर्मन चाचणी संस्थेशी (ATS) संलग्न राहून ४० ते ५० कोटी रुपये खर्चून उभारलेली भारतातील सर्वांत मोठी स्वतंत्र बॅटरी चाचणी सुविधा (Battery Testing Facility) होय, जिथे इतर कोणत्याही कंपनीच्या बॅटऱ्यांची स्वतंत्रपणे चाचणी व प्रमाणीकरण केले जाऊ शकते.
‘बॅटरी ॲझ अ सर्व्हिस’चे अभिनव मॉडेल
ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कंपनीने ‘बॅटरी ॲझ अ सर्व्हिस’ (Battery as a Service) हे अभिनव मॉडेल आणले आहे. यात ग्राहक बॅटरीशिवाय ट्रक खरेदी करू शकतात, ज्यामुळे ट्रक्सची सुरुवातीची खरेदी किंमत ४० टक्क्यांनी कमी होते. कंपनी बॅटरीची मालकी स्वतःकडे ठेवून अवघ्या ७ मिनिटांत बॅटरी स्वॅप करून देते. डिझेल ट्रकचा प्रवास खर्च ३६ रुपये प्रति किलोमीटर असतो, तर ईव्ही ट्रकचा बॅटरी सर्व्हिससह खर्च अवघा २५ रुपये प्रति किलोमीटर पडतो. यामुळे वर्षाला १ लाख किलोमीटर धावणाऱ्या ट्रकला चालन खर्चात (Operating Cost) तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची थेट बचत होते असा दावा मुरकुंबी यांनी केला.
१ ते ३ मेगावॉट क्षमतेची ‘मेगाप्लेक्स’ चार्जिंग स्टेशन्स
वाहतुकीसाठी महामार्ग, बंदरे आणि औद्योगिक संकुलांमध्ये १ ते ३ मेगावॉट क्षमतेची ‘मेगाप्लेक्स’ (Megaplex) चार्जिंग स्टेशन्स उभारली जात असून या वर्षात ४० स्टेशन्स सुरू होत आहेत. चीनमध्ये ४० टक्के ट्रक्स ईव्ही झाल्यामुळे १५० दशलक्ष बॅरल्स डिझेलची बचत झाली आहे, त्याच धर्तीवर भारतात हा विस्तार केला जात आहे. पुढील ३ वर्षांत पुणे, औरंगाबाद आणि बेळगाव-धारवाड या ऑटोमोबाईल पट्ट्यातील स्थानिक पुरवठादारांच्या मदतीने ट्रक्सचे सर्व सुटे भाग भारतातच बनवले जातील (Indigenization).
तांत्रिकदृष्ट्या या ईव्ही ट्रकमध्ये ४०० किलोवॅट क्षमतेची शक्तिशाली मोटर देण्यात आली आहे, जी अवघड घाटातही सहज पिकअप देते. गिअरलेस रचना आणि वातानुकूलित (AC) केबिनमुळे चालकांचा प्रवास अत्यंत सुखकर बनतो. वाहनांना ARAI कडून आवश्यक होमोलोगेशन मिळाले असून जेएनपीटी (JNPT) बंदर आणि सोनिपत येथे कंटेनराईज्ड सर्व्हिस स्टेशन्स कार्यान्वित करण्यात आली आहे असे मुरकुंबी यानी सांगितले.













