पुणे: शासकीय वसतिगृहात नक्षलवादी हिडमाचे समर्थन; अभाविपची देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी

Pune Hostel Naxalite Support Controversy
Pune Hostel Naxalite Support Controversy

पुणे(प्रतिनिधी)–पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत ठार झालेला नक्षलवादी कमांडर हिडमा याचे समर्थन करणारे नृत्य सादर करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आक्रमक पवित्रा घेत स्वारगेट चौकात आंदोलन केले आणि संबंधित दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अभाविप पुणे महानगरच्या वतीने नक्षलवादी कमांडर हीडीमाचा पुतळा यावेळी जाळण्यात आला.

सदर वसतिगृहात ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ११ एप्रिल रोजी ‘ओ बंदूकवाले’ या गाण्यावर एका नृत्याचे सादरीकरण करण्यात आले, असा अभाविपने केला आहे.  या सादरीकरणादरम्यान नक्षलवादी हिडमाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या आणि तो कसा ‘देशप्रेमी’ आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारी जागेत आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेत अशा प्रकारे देशविघातक मानसिकतेचे प्रदर्शन घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

अधिक वाचा  'लाडकी बहीण' योजनेत 'इलेक्टोरल भ्रष्टाचार'; आरटीई, शिक्षण अभियानाचा निधी वळवला: सुप्रिया सुळेंचा खळबळजनक आरोप

दरम्यान, या प्रकरणाबाबत विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्यांना आयत्या वेळी हे गाणे देण्यात आले होते आणि त्यांनी केवळ सादरीकरण केले. मात्र, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. व्हिडिओतील दृश्ये आणि सादरीकरणाची पद्धत पाहता, हा प्रकार आयत्या वेळचा नसून गेल्या २०-२५ दिवसांपासून याची पद्धतशीर तयारी सुरू होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. हे विद्यार्थी २५ ते २६ वयोगटातील असून, त्यांच्या मागे कोणाची चिथावणी आहे का, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे अभाविपने म्हटले आहे.

प्रमुख मागण्या आणि आरोप

चौकशीची मागणी: या घटनेमागे वसतिगृहातील काही अधिकारी किंवा गृहपाल (वॉर्डन) यांचा हात असावा, असा संशय अभाविपने व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  ओप्पो F33 आणि F33 Pro भारतात लॉन्च : ७००० mAh बॅटरी आणि प्रगत AI फीचर्ससह मिळणार 'आर्मर बॉडी' सुरक्षा

कायदेशीर कारवाई: नक्षलवादी विचारसरणीचा प्रसार करण्याच्या हेतूनेच हा कट रचला गेल्याचा आरोप करत, विद्यार्थी परिषदेने पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

गुन्हा दाखल करणे: या प्रकरणात सहभागी असलेले विद्यार्थी, त्यांना प्रोत्साहन देणारे अधिकारी आणि वॉर्डन यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love