पुण्यामध्ये विजयादशमी निमित्त ५५ ठिकाणी ७१ पथसंचलने : ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक गणवेशात सहभागी होणार

पुणे विजयादशमी पथसंचलन
पुणे विजयादशमी पथसंचलन

पुणे(प्रतिनिधी)–राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त पुणे शहरात ५५ ठिकाणी ७१ पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिस्तबद्ध पथसंचलनांमध्ये ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये बालस्वयंसेवकांची १३ पथसंचलने आकर्षण ठरणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात शाखा विस्तार अभियान पार पडले, त्यामुळे यंदाच्या संचलनांत स्वयंसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन म्हणूनही साजरा केला जातो. नागपूर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत शस्त्रपूजन पार पडते. या वर्षी दैनिक जागरणचे ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. देशभरात नगर व तालुका स्तरावर पथसंचलन व शस्त्रपूजन उत्सवांचे आयोजन केले जाते. पुण्यातील बहुतांश पथसंचलन उद्या, २० ऑक्टोबर (मंगळवारी) रोजी पार पडतील. या शिस्तबद्ध संचलनासोबतच शस्त्रपूजन उत्सवात शारीरिक प्रात्यक्षिके आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

अधिक वाचा  यंदाचा जनसेवा पुरस्कार‘अस्तित्व प्रतिष्ठान’ला जाहीर

गोखलेनगर येथील शस्त्रपूजन उत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मनमोहन वैद्य यांचे व्याख्यान आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेट क्रमांक ४ च्या मैदानावरून मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पथसंचलनाला सुरुवात होईल, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता पथसंचलन पार पडेल. शहराच्या विविध भागांत होणाऱ्या या शिस्तबद्ध व कडक गणवेशातील पथसंचलनामुळे संपूर्ण पुणे नगरीत देशभक्तीचा अनोखा उत्साह पाहायला मिळणार आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातही तालुका किंवा नगर स्तरावर पथसंचलने व शस्त्रपूजन उत्सव आयोजित करण्यात आले आहेत.

पथसंचलनांच्या स्वागताची तयारी:

शहरात विविध ठिकाणी पथसंचलनाच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच चौकांमध्ये संचलन मार्गावर रांगोळी काढून स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. विशेष म्हणजे समाजातील सर्व स्तरांतील नागरिक या पथसंचलनाचे उत्साहाने स्वागत करतात.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love