सावरकरांना “स्वातंत्र्यवीर” का म्हणावे ?


नुसते ‘सावरकर ‘ (savarkar) असे म्हणण्याऐवजी “स्वातंत्र्यवीर सावरकर” (swatantryavir savarkar) असे पूर्ण म्हंटले की एक तेजस्वी शब्द  आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत असे  भासते  व सावरकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो . कारण स्वातंत्र्य व सावरकर हे अभिन्न आहेत , हे दोन वेगळे शब्द भासत असले तरी! जसं आपण सर्वसामान्य मनुष्य श्वास घेतो , तसाच आपल्या भारतमातेला ‘ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे  हाच केवळ  सावरकरांचा श्वास व आयुष्यभराचा ध्यास होता.

वीर सावरकर यांना पहिल्यांदा “स्वातंत्र्यवीर सावरकर” असे लिखित स्वरूपात ‘ स्वातंत्र्य’ च्या अंकात म्हटले गेले . हा अंक ४-९-१९२४ चा अंक होता. यात चिटणीस प्रभाकर यांचा ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर कुंडली विचार’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. ह्या ज्योतिषाने हे भविष्य वर्तविताना सावरकरांना ‘ स्वातंत्र्यवीर’ म्हटले आहे . या ज्योतिषाने सांगितलेली भविष्ये  खरी झाली नाहीत ,  पण पुढे जाऊन ‘ स्वातंत्र्यवीर’ हा शब्द मात्र कायमचा रूढ झाला . कवी वैशंपायन यांनीही याच काळात लिहलेल्या एका कवितेत त्यांचा उल्लेख ‘ स्वातंत्र्यवीर ‘ असा केलेला आढळतो . हा समारंभ नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झाला होता . येवला येथे सावरकरांचे कुमार वयातील मित्र वामनशास्त्री दातार यांच्याकडे सावरकर तेव्हा  थांबले होते .

(संदर्भ – रत्नागिरी पर्व – बाळाराव सावरकर , दोन तात्या – प्रा वा बा दातार ).

तर ही पदवी सावरकरांना त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी उस्फूर्त पणे दिली होती . याच काळातील अजून एक संदर्भ असा मिळतो ( साधारण दिनांक १३ नोव्हेंबर १९२४ ) की जेव्हा सावरकर नाशिक सोडून परत रत्नागिरी ला जावयास निघाले तेव्हा मुंबईचे कवी सोपान यांनी ‘ गोदातीरस्थ स्वातंत्र्यवीरास ‘ नावाची त्यांच्यावर स्तुतीपर कविता लिहली होती , त्यातल्या काही ओळी येथे देतो ,

स्वातंत्र्यही मोक्ष महादेव जयाला

कविनायक!जनताही वंदि तयाला

जनवासी असूनि विजनवास कपाळा!

भव्य अशा प्रतिच्या नमन नृपाळा’

यावरून लक्षात येते की  स्वातंत्र्यवीर’  ही उपाधी त्यांच्या नावामागे लागली व  अल्पावधीतच  किती लोकप्रिय झाली असावी! याचे कारण  ती अगदी यथार्थ व सुयोग्य अशीच  होती !

आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला नेहमीच अनेक प्रेरणास्थळे वावरत असताना दिसतात व आपण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो . वीर सावरकरांची प्रेरणा आपला भारत  देश  व ध्येय   अगदी बालपणी देखील “भारताला स्वातंत्र्य”  मिळावे हेच होते.  त्यांनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आपल्या घरातील अष्टभुजा भवानी समोर  ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी शत्रूस मारिता मारिता मरेतो झुंजेंन!” अशी शपथ घेतली , आणि या शपथेनंतर विनायकाने कधीही माघार घेतली नाही .

अधिक वाचा  त्याच ठिकाणी डुक्कर बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

पुढे जाऊन सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले . येथेही त्यांच्या मनातील क्रांतिकारक स्वस्थ बसला नव्हता . १९०३ साली पुणे येथेच त्यांनी ” जयोस्तुते ” नावाचे महान काव्य रचले , हे काव्य म्हणजे स्वातंत्र्य देवीसाठी रचलेले महामंगल स्तोत्र आहे . ही कविता वाचूनही विशीतल्या सावरकरांची दृढ इच्छाशक्ती व आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याबद्दलची तळमळ दिसून येते . या कवितेत सावरकर म्हणतात ,

हे अधम रक्त रंजितें !सृजन पूजितें! श्री स्वतंत्रते

तुजसाठी मरण तें जनन

तुजवीण जनन ते मरण

तुज सकल चराचर शरण!!

हे स्वातंत्र्य देवी तुझ्यासाठी मरणे हे जगणेच असेल, व तुझ्याविना जगणे हे मरणासारखेच  असेल ! किती ते सुदंर काव्य !किती ती उदात्त कल्पना!!

जसे वर सांगितले त्याप्रमाणे विनानायकाने अगदी कुमार वयापासून  भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला होता , पण त्यासाठी तुरुंगात जाऊन खितपत पडणे त्यांना मान्य नव्हते . पण जेव्हा नाशिक अभियोगात त्यांचे कित्येक सहकारी पकडले जाऊ लागले व त्यांचा अनन्वित छळ होऊ लागला . सावरकर तेव्हा पॅरिस येथे सुरक्षित होते , पण आपले परमप्रिय सहकारी पकडले जात असताना आपण मात्र भ्याडासारखे मागे राहणे त्यांच्या तात्विक व सरळ मनाला पटत नव्हते . म्हणून ते लंडनला गेले व तेथे लंडनच्या रेल्वे स्थानकावर त्यांना अटक झाली . ब्रिटिशांनी त्यांचा खटला भारतात चालविला जावा या उद्देशाने त्यांना मारिया बोटीतून भारताकडे घेऊन जाऊ लागले .त्याचवेळी मार्सेलीस ( फ्रांसचा किनारा ) येथे त्यांनी उडी घेतली व निसटण्याचा प्रयत्न केला . यामागे ही आपण  स्वतंत्र राहिले पाहिजे , ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत न पडता बाहेर राहून कार्य केले पाहिजे हाच विचार होता . त्यांची ही’ समुद्र-उडी’  जगभर गाजली . यावेळी सावरकरांचे वय २७ वर्ष असे होते , पण विचारांची सुस्पष्टता  अशीच होती की , स्वतंत्र राहूनच मोठे काम करता येईल .

आज आपल्यापैकी जे कोणी अंदमानात जाऊन आले आहेत , तेच कल्पना करू शकतात की सावरकरांनी अंदमानात काय काय भोगले असेल ! कारण सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात सोसलेल्या या भयभीषण जीवनापुढे , दुसऱ्या कोणत्याही भारतीय नेत्याने भोगलेला कारावास साफ फ़िका पडतो . पण तरिही त्यांनी हा कारावास निश्चल व अभूतपूर्व धैर्याने सहन केला होता . याचे मुख्य कारण ही त्यांच्या मनातील भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची दुर्दम्य इच्छा ! शिवाय त्यांनी त्याच धैर्याने कृतिशील राहून , तुरुंगाच्या वातावरणात सुधारणा व्हावी म्हणून अनेक आंदोलने केली . अंदमानात त्यांनी जे भोगले , सहन केले ते अतुलनीय होते ,  त्यामूळे’ स्वातंत्र्याचे ‘ खरे मोल सावरकरांच्या इतके कदाचितच कुणाला माहीत असेल ! त्यांची पूर्ण सुटका होणे ही खूप कठीण गोष्ट होती , कारण ब्रिटिशांचा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नव्हता . दहा पेक्षा जास्त वर्षे भयंकर कारावास भोगलेल्या सावरकरांबद्दल  नंतरही कशी भीती होती ते पहा ,

अधिक वाचा  #Sharad Mohol Murder Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

सावरकरांपासून देशाच्या शांततेला भय आहे ” – इति सेंडन .

सर विल्यम व्हिन्सेंट (Sir William Vincent) म्हणाला , ” सावरकरांची सुटका करण्यास मुंबई सरकारचा प्रखर विरोध आहे .कारण त्यांची मुक्तता झाल्यावर मोठी खळबळ उडेल आणि प्रांतात भयंकर प्रसंग घडतील असे भय वाटते ”  हे सगळे असूनही बाहेर असलेल्या सावरकरांच्या सहकाऱ्यांच्या अगणित प्रयत्नांना यश येऊन त्यांची अंदमानातून सुटका होऊन त्यांना भारताच्या मुख्य भूमीवरील अलीपुर तुरुंगात हलविण्यात आले . मग तेथून पुढे त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले . सावरकरांची पूर्ण सुटका होण्यास १९३७ हे वर्ष उजाडले ..येथे एक विशेष नमूद करावेसे वाटते , सावरकरांना जेव्हा १९१० या वर्षी दोन जन्मठेप (एकूण पन्नास वर्षे ) अशी भयंकर शिक्षा सुनावली तेव्हा ठाण्याच्या कारागृहात एका अधिकाऱ्यांने त्यांना उपहासाने म्हटले की , ” १९६० साली ब्रिटिश सरकार खात्रीने तुमची सुटका करेल !” सावरकरांनी तेव्हा खाडकन विचारले , ” पण प्रत्यक्ष ब्रिटिश राजवट तरी आणखी पन्नास वर्षे टिकेल काय ?” हा प्रश्न ऐकून त्या अधिकाऱ्यांचे थोबाड गप्प झाले ! म्हणजे किती ती सावरकर यांची दुर्दम्य स्वातंत्र्याची आकांक्षा व किती तो आत्मविश्वास ! त्यांच्यात असलेल्या शुराला शोभणाऱ्या  धैर्यामुळे त्यांना सतत वीर म्हणून संबोधले गेले व या धैर्यवान पुरुषाचे  ध्येय स्वातंत्र्य असल्याने त्यांच्या मागे उस्फुर्ततेने ” स्वातंत्र्यवीर ” हे नामनिधान लागले .

क्रांती च्या मार्गावर चालणारे मृत्यूची भीती कधीही बाळगत नसत . पण हे काम करताना मृत्यू कधीही आपणास मिठी मारणार , हे त्या वीरांना माहीत असतेच ! १९३७ साली पूर्ण सुटका झालेले सावरकर कधीही शांत बसले नाही . त्यांनी हिंदुमहासभा , भागानगरचा लढा ,  इतर अनेक आंदोलने यांच्या माध्यमातून देशसेवा सुरूच ठेवली .  सावरकरांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे ‘ हिंदूंचे व भारतीयांचे सैनिकीकरन ‘ ! ब्रिटिश सैन्यात मोठ्या संख्येने भारतीय सैनिक गेल्याने त्यांना आयते शस्रे चालविण्याचे प्रशिक्षण मिळाले व सावरकरांच्या दूरदृष्टीने योग्य वेळ येताच त्या बंदुकांची टोके इंग्रजांच्या दिशेने वळवली गेली ( नाविक दलाचे बंड व आझाद हिंद सेना ) . पण स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांचे हे श्रेय कायम नाकारले गेले , तरीही त्याची खंत सावरकरांनी कधीही बाळगली नाही .  त्यांच्या जागी इतर कुणी असते तर , इतकी भयंकर शिक्षा भोगून झाल्यावर शांत बसले असते , पण सावरकरांची भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची दुर्दम्य इच्छा व महत्वकांक्षा होती . तशी त्यांनी घनघोर प्रतिज्ञा केली होती व आयुष्यभर ते कधीही ही प्रतिज्ञा विसरले नाही . अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला !

अधिक वाचा  महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार?जागावाटपही झालं निश्चित?

असंख्य क्रांतीवीर , देशासाठी लढलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांचे स्वप्न पूर्ण झाले , सावरकरांचे स्वप्न पूर्ण झाले .  सावरकरांनी पूर्ण आयुष्यात स्वतःचा कुठलाही स्वार्थ बाळगला नाही , गैर  वा भ्रष्ट मार्गाने कधीही अवैध संपत्ती गोळा केली नाही . भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देणे हाच त्यांचा श्वास व ध्यास होता . म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी काही वर्षातच आपल्या ‘ अभिनव भारत ‘ या क्रांतिकारक संस्थेला विसर्जित केलें . शिवाय त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात अपरिमित कष्ट उपभोगून  सुद्धा नंतरच्या सरकारी दरबारी कुठल्याही सवलती , फायदे , भत्ते इ ची कसलीही  अपेक्षा ठेवली नाही वा तशी विनंती ही केली नाही .

पुढे १९६० हे वर्ष देखील ‘ याची देही , याची डोळा ‘ बघण्याचे भाग्य त्यांना लाभले . हे वर्ष  पूर्ण भारतवर्षाने ” मृत्युंजय वर्ष”  म्हणून साजरे केले , कारण त्यांच्या दोन्ही जन्मठेपी याच वर्षी पूर्ण होणार होत्या . पण सावरकरांनी ज्या दुर्दम्य आत्मविश्वासाने सांगितले होते , तसेच झाले व भारताला आधीच स्वातंत्र्य मिळाले .

निस्वार्थ बुद्धीने फक्त देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सतत झटत राहणारे सावरकर हेच खरे ” स्वातंत्र्यवीर” या पदवीला भूषण ठरले . म्हणूनच आजही ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर ‘ असे म्हणताना मान उंचावते व हृदय अभिमानाने भरून येते .

©हेमंत सदाशिव सांबरे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love