पुणे–कोरोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर होम क्वारंटाइन झालेल्या पुण्यातील सहकारनगर भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नागनाथ भोसले हे सहकारनगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत अनेक वर्षापासून राहण्यास होते. संदीप यांच्या वडिलांना देखील करोनाची लागण झाली होती. या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांत संदीप यांना देखील करोना झाल्याचा अहवाल आला.
संदीप यांनी करोनावरील उपचार घेतले आणि डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीमधील घरी राहत होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना सासरी सोडले होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ काल सकाळच्या सुमारास नाष्टा घेऊन पद्मावती येथील घरी आल्यावर, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोंच्या संकटामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकतर कोरोनाची भीती, दुसरीकडे कोरोनामुले वाढलेली बेरोजगारी यामुळे अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळे आत्महत्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. भोसले यांच्या वडिलांचे कोरोनानेच निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण होते. भोसले यांनी त्यांना आलेल्या नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.