‘राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव | सुदृढ बाळासाठी पोषण आहार’

आरोग्य
Spread the love

अहमदनगर –क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे व पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग), मुंबई, तसेच महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वेबिणारमध्ये आहारातून साधलेले आरोग्य, हा जीवनाचा पाया असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पोषण माह अभियाना’चा उल्लेख करून मुलांचे सामर्थ्य व क्षमता यामध्ये आहाराची सर्वात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले होते, व जनभागीदारीतून भारताला कुपोषण मुक्त करता येईल, असे आवाहन केले होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे व पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग), मुंबई, तसेच महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

‘राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव | सुदृढ बाळासाठी पोषण आहार’ विषयावरील या वेबिनारमध्ये संध्या नगरकर, सहाय्यक आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना, महाराष्ट्र शासन, संजय कदम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर, वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, अहमदनगर, सोपान ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी, अहमदनगर, व योगेश जोशी, रिलायंस फाउंडेशन, अहमदनगर या सर्वांनी मार्गदर्शन केले.

राहुल तिडके, उपसंचालक, पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांनी आपल्या प्रास्ताविकात, आहार हा व्यक्ती/कुटुंबाच्या आरोग्याचा पाया असल्याचे नमूद केले. पूर्वापार आपल्याकडे योग्य आहाराला अत्यंत महत्व असून, त्याला पूर्णब्रह्म संबोधले गेले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बाळाचे पहिले अन्नप्राशन सोळा संस्कारांपैकी एक आहे आणि आपल्याकडे आहाराशी संबंधित सोहळे साजरे होतात, यावरूनच महत्व अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिकारशक्ती खूप चांगली असणे, याला अत्यंत महत्व असून, सोबतच स्वच्छता व कोरोना काळात ‘एसएमएस’ अर्थात ‘सॅनिटाईझ, मास्क आणि सेफ डिस्टन्स’ याला महत्व देण्याचे सुचविले. सरकार तुमच्या स्वयंपाकघरात येऊ शकत नाही, पण सरकार तुमच्यापर्यंत आणि तुम्ही स्वयंपाकघरापर्यंत अशी रचना लागू शकते, असेही ते म्हणाले.

संध्या नगरकर, सहाय्यक आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना, महाराष्ट्र शासन, यांनी ‘राष्ट्रीय पोषण आहार मोहिम: महत्व व आलेख’ यावर प्रकाशझोत टाकला. गरोदर, स्तनदा माता, २ वर्षांपर्यंतची मुले हे केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले. वेबिनारमध्ये सहभागी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी, काम करताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील सदस्य संख्या, मातेची समज, तिच्या शंका याचा नक्की विचार करावा, असे सांगितले. तसेच, चित्रांचा, परिसरातील वयस्क महिलांच्या अनुभवाचा मार्गदर्शनासाठी लाभ घ्यावा, अशीही कल्पना त्यांनी मांडली. अहमदनगर जिल्ह्यातील लहानमोठ्यांचे रक्तक्षय निर्मूलन करून आरोग्याच्या सर्वच बाबतीत जिल्ह्याला कसे पुढे नेता येईल, प्रत्येक बालक सुदृढ कसे होईल, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, संजय कदम यांनी जिल्ह्याचा ‘राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम’ कसा सुरु आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक भूक निर्देशांकात भारताचा १०२ क्रमांक आहे; लोकसंख्या व कुपोषणामुळे आपण फारच मागे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले; यामध्ये सुधारणा करण्याचे काम सर्वांनी एकत्र येऊन करूयात, असे आवाहन त्यांनी केले. महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये, उपलब्ध वेळेत अधिकाधिक चांगले काम करून जिल्ह्यातील कुपोषण दर कमी करूयात, असा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, घारगाव प्रकल्प, संगमनेर यांनी ‘बाळाचे पहिले १००० दिवस’ या विषयावर माहिती दिली. बाळाचे वजन, उंची डोक्याचा घेर, संपूर्ण शारीरिक वाढ आणि आईचे दूध यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे कुकडे यांनी यावेळी सांगितले. आपला प्राण हा अन्नमय आहे, त्यामुळे बाळाचा वरचा आहार देखील कसा असावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ‘सही पोषण, देश रोशन’ या उक्तीचा उल्लेख करून त्यांनी देशकार्य म्हणून बालकांची समाजाने जबाबदारी घ्याची, असे आवाहन केले.

सोपान ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी, वढाळा प्रकल्प, नेवासा यांनी ‘कुपोषित बाळाचे व्यवस्थापन’ याविषयी मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या वजन व उंचीचे नियोजन करून कुपोषित बालकावर लक्ष दिले जाते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर कुपोषित मुलांना दाखल करून, आरोग्य व आहार संहिता, औषधी यांद्वारे कशाप्रकारे उपचार दिले जातात, याची माहिती ढाकणे यांनी याप्रसंगी दिली.

रिलायंस फाउंडेशन, अहमदनगरचे योगेश जोशी यांनी ‘परसबागेचे व्यवस्थापन’ याविषयी सादरीकरण केले. अंगणवाडी परिसरात परसबाग उभी करून माता व मुले यांना योग्य आहार देता येईल, अशी उत्तम कल्पना त्यांनी यावेळी सांगितली. यासाठी उपलब्ध जागेत किंवा आपल्या घरातच असलेल्या कमी जागेत परसबागेचे कसे व्यवस्थापन करता येईल, याची त्यांनी माहिती दिली. “रसायनयुक्त भाजीपाला टाळा आणि घरोघरी भाजी पिकवा”, असे आवाहन त्यांनी सहभागींना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानूसार “नेशन अँड न्यूट्रिशन, यामध्ये महत्वपूर्ण संबंध आहे; “यथा अन्नम् तथा मन्नम्” अर्थात अन्नानुसार मानसिक व बौद्धिक विकास होत असतो, यासाठी जनआंदोलन उभे करून पोषक अन्न व स्वस्थ राहण्यासाठी आपण सगळ्यांना प्रेरित करू, या संकल्पावर वेबिनारची सांगता झाली.

या वेबिनारमध्ये सुमारे २८०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. माधव जायभाये, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर यांनी या वेबिनारचे सूत्रसंचालन केले; व डॉ. जितेंद्र पानपाटील, व्यवस्थापक, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *