पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात ज्येष्ठांविषयी प्रेम, आत्मियता आणि आदर वृद्धिंगत होईल यादृष्टीने अभ्यासक्रमाचा अंतर्भाव व्हावा, जेणेकरून लहान मुलांना कोवळ्या वयातच ज्येष्ठांविषयीच्या या संवेदना बिंबवल्या जातील. योग्य वयात या संवेदना बिंबवण्यात आपण यशस्वी झालो, तर ज्येष्ठांविषयी आज उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू, अशी अपेक्षा पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.के. जैन यांनी व्यक्त केली.
जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने दिनांक 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विविध ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अॅड. जैन आज बोलत होते.
जागतिक ज्येष्ठ नागरीक दिना निमित्त जनसेवा फाैऊंडेशनतर्फे आर.आर.टी.सी, केंद्र सरकारचा सामिजीक न्याय व सबलीकरण मंत्रालयातर्फे नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर सिनिअर सिटीझनच्या उपक्रमांतर्गत, सामाजिक विभाग महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, भारती योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग, एकता परिवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, आयएलसी इंडिया, आईस्कॉन, फेसकॉम, एस्कॉप आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना अॅड. एस के. जैन म्हणाले की, पितृ देवो भवः, मातृ देवो भवः आणि एकत्र कुटुंब पद्धती ही आपली संस्कृती असून जागतिकीकरण आणि विकासाच्या फसव्या अकल्पनेमागे आपण धावत सुटल्याने एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस येऊन विभक्त कुटुंब पद्धती रूढ झाली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीपासून विभक्त कुटुंब पद्धती पर्यंतच्या या स्थित्यंतरामुळे ज्येष्ठांविषयीचे प्रश्न प्रकर्षाने पुढे येत आहेत. शहरी ज्येष्ठ नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीकांची अवस्था तुलेनेने बरी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि संपत्तीबाबत कायद्यात करण्यात आलेल्या तरतुंदींनुसार ज्येष्ठांच्या सक्षणीकरणावर भर देण्यात आलेला आहे. मात्र, कायद्याच्या अनुषंगाने बराच मोठा पल्ला गाठणे आजही प्रलंबित आहे. ज्येष्टांविषयीच्या 2007 च्या कायद्यानुसार मुले, मुली आणि सुना यांना तीन महिन्याच्या शिक्षेचे प्रावधान आहे. 2007 च्या कायद्यात नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणेनुसार कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद असून ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती गिफ्ट डीड केली असेल, आणि वचन दिल्यानुसार मुले ज्येष्ठांचा सांभाळ करीत नसतील तर ते गिफ्ट डीड रद्दबातल करण्याची तरतूद या कायद्यात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी मुलांचा जीवनस्तर आणि त्यांची आर्थिक आवक हे मुद्दे गृहित धरून घरातील ज्येष्ठांना औषधोपचार, मनोरंजन, पर्यटन, कपडेलत्ते आदी घटक लक्षात घेऊन मुलांनी त्यानुसार आर्थिक तरतूद करणे अनिवार्य केले आहे. या तरतुदींपैकी काही तरतुदी केवळ कागदावरच राहिल्याने ज्येष्ठांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. कायद्याने ज्येष्ठांना सुरक्षितता प्रदान करीत असताना ज्येष्ठ नागरिक देखील कुठे चुकन नाहीत ना, हेदेखील तपासून पाहिले पाहिजे. कायदे आणि आत्मिक, भावनिक ओलावा याचा सुवर्णमध्य साधूनच ही समस्या सोडविणे शक्य होणार आहे, असेही जैन यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना अॅड. बळवंत निसाळ म्हणाले की, ज्येष्ठांविषयी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कागदोपत्री सक्षम असले तरीही अंमलबजावणी पातळीवर ते कुचकामी ठरत आहेत. ‘नालसा’ अंतर्गत 1987 पासून ज्येष्ठांविषयीच्या कायद्यांबाबत भारत नेतृत्व करीत आहे. परंतु, या कायद्यांचा प्रचार-प्रसार पुरेसा न झाल्याने त्यांची परिणामकारकता पुरेशा प्रमाणात साधता आली नाही. ज्येष्ठांविषयीच्या कायद्यात अनेक पातळ्यांवर संदिग्धता असल्याने जास्तीत जास्त 90 दिवसात ही प्रकरणे निकाली लागणे अपेक्षित असतांना 3-3 वर्षे याचे निकाल लागत नाहीत.
ज्येष्ठांविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी पुणे पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांनी त्यांना येत असलेल्या अनुभवांचे कथन केले. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिक कक्ष प्रमुख या नात्याने कर्तव्य बजावत असताना ज्येष्ठांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी आमचा कक्ष कार्यान्वित आहे. त्यासाठी 1090 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला असून येथे येणाऱ्या ज्येष्ठांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण केले जाते. आजवर सुमारे 4 हजार 486 हून अधिक तक्रारी आल्या असून या कक्षामार्फत समुपदेशनाव्दारे प्रयत्नपूर्वक या तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात बीट मार्शलच्या सोबतीने ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन काढून देण्यास मदत करणे, औषधोपचार, भाजी आणि दूध पुरवठा करणे, त्यांच्याशी संवाद साधून भावनिक आधार देणे यास्तरावर या कक्षाने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ज्येष्ठांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत त्यांचे उत्तरायुष्य अधिकाधिक सुखावह आणि समाधानी व्हावे, यादृष्टीने हा कक्ष कार्यरत आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघाच्या महासचिव डाॅ. जेन बॅरेट यांनी व्हिडिओ संदेशाव्दारे जनसेवा फौंडेशनच्या कार्याचा गौरव करीत संपूर्ण जगात ज्येष्ठांविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयएफए अर्थात इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंग करीत असलेल्या ज्येष्ठांच्या आरोग्या संदर्भात क्रीयाशील, कृतीशील आणि आरोग्यवर्धक वार्धक्य, ज्येष्ठांना पूरक शहर निर्मिती, लैंगिक असमानता आदी मुद्यांवर विस्ताराने मार्गदर्शन केले. तसेच भारतातील नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रेरणा कलामंच निर्मित कौटुंबिक नाटकीचे सादरीकरण शशिकांत पेठे या 82 वर्षीय ज्येष्ठ कलाकारासह क्रीश पेठे या 12 वर्षाच्या बालकलाकाराने केले. क्रीयाशील ज्येष्ठत्व कसे असावे, याचा आदर्श वस्तुपाठ सुरेखा पेठे, कांचन श्रॉफ, चारूलता पाटील आणि चंदा मानकर यांनी सादर केला. तसेच भारतीय योग संस्थान संस्थेतर्फे योग-प्राणायामाचे महत्व याविषयी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले. सूत्रसंचालन जनसेवा फौंडेशनच्या आर.आर.टी.सी.च्या संशोधन विभागाचे संचालक बी.टी. लावणी यांनी केले. जनसेवा फौंडेशनच्या विश्वस्त कैलास पटेल यांनी आभार मानले.