डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान -डॉ. विजय भटकर


पुणेः- जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप पाहता ज्येष्ठांना घरामध्ये एकटेपणा जाणवतो. परंतु, डिजीटल क्रांतीमुळे त्यांना एक सवंगडी मिळाला असून डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान ठरली आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने दिनांक 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  या कार्यक्रमात आज समारोप सत्रात  मार्गदर्शन करताना  डॉ. विजय भटकर बोलत होते.  या कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव, सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाचे अतिरीक्त सचिव शंभू शरणकुमार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक डॉ. संजीव गुप्ता, डॉ. अश्विनी पेठे, एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड,रोटेरीयन विनय कुलकर्णी, तसेच जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद शहा, विश्वस्त मीना शहा  आदी मान्यवर सहभागी झाले होते.

जागतिक ज्येष्ठ नागरीक दिना निमित्त जनसेवा फाैऊंडेशनतर्फे आर.आर.टी.सी, केंद्र सरकारचा सामिजीक न्याय व सबलीकरण मंत्रालयातर्फे नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर सिनिअर सिटीझनच्या उपक्रमांतर्गत, सामाजिक विभाग महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, भारती योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग परिवार, एकता योगा ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, आयएलसी इंडिया,  आईस्कॉन, फेसकॉम, एस्कॉप आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले की, माझा जन्म 1946 सालचा असून त्याच काळात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्या दरम्यानच संगणक आणि ट्रान्झिस्टर या उपकरणांचा शोध लागला आणि संपूर्ण जगच पालटून गेले. सातत्याने होणा-या अविष्कारांमुळे मानवी आयुष्य अधिकाधिक सुखकर आणि तंत्रज्ञानाने व्यापून गेले. आज व्हिडिओ कॉन्फरन्सींग सारख्या तंत्रज्ञानाव्दारे आपण घरबसल्या शिक्षण घेत आहोत. ते या अविष्कारामुळे शक्य झाले आहे. वैज्ञानिक आणि संगणकीय पातळीवर होत असलेल्या या संशोधनात ज्येष्ठ नागरिकांचे स्थान काय असेल, हा चिंतनाचा विषय आहे. सूपर  कॉम्प्युटरच्या तुलनने स्मार्ट सक्षम झाले असून सर्व तंत्रज्ञान, विज्ञान तुमच्या एका बोटाच्या स्पर्शावर येऊन ठेपले आहे. संगणक साक्षर देशांच्या यादीत भारत आज वरच्या स्थानावर आहे. सुरूवातीला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शब्दाचे स्पेलिंग देखील माहीत नसलेल्या भारताने आज सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. या संगणकीय अविष्कारामुळे भारताचे परकीय चलन अनेक पटींनी वाचले आहे. भारतातील पारंपारिक चिकीत्सा पद्धती आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालत इंटरग्रेटीव्ह मेडिकल यंत्रणा आपण कार्यान्वित करणार आहोत.

अधिक वाचा  मूल्य संवर्धनासाठी ज्येष्ठांनी योगदान द्यावे - डॉ. रघुनाथ माशेलकर

  खासदार डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू या नात्याने कार्यरत असताना ज्येष्ठांना शिक्षणाची कवाडे खुली व्हावीत, यासाठी मी पीएचडी कार्यक्रमाची घोषणा केली होती. केवळ अकरावी पास झालेले ज्येष्ठ नागरिक या अटींवरच त्यांना प्रवेश दिले जात होते. पंधरा दिवसात सुमारे पाच हजार ज्येष्ठ नागरिकांनी पीएचडीसाठी नोंदणी केली आणि 91 वर्षांचे विद्यार्थी देखील त्यात सहभागी झाले होते. समाजाच्या प्रगतीसाठी ज्येष्ठांचे अनुभव आणि ज्ञान यांचा उपयोग व्हावा आणि ज्येष्ठ कार्यरत रहावे, या दृष्टीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. वयोमान ही शारीरिक संकल्पना नसून ही मानसिक संकल्पना आहे. शरीराचे वय वाढत असले पण आपण मानसिकदृष्टया जिंदादील असलो तर शरीराच्या वयाच्या आपल्यावर मर्यादा येत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणे हा उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा मूलमंत्र आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जोपासू न शकलेले छंद, उपक्रम सेवा निवृत्तीनंतर जोपासवे, बाळगावे आणि त्यातून आनंद मिळवावा.

 सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाचे अतिरीक्त सचिव शंभू शरणकुमार म्हणाले की, भारत आज तरूण देश असला तरी त्याची उद्याचा ज्येष्ठ नागरिकांचा देश या दिशेने वाटचाल सुरू आहे. वैद्यकीय शास्त्रात दिवसागणिक होत असलेल्या संशोधनामुळे वाढत चाललेली वयोमर्यादा ही एक जमेची बाजू असली तरी ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या हे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील एक मोठे आव्हान आहे. नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर सिनिअर सीटीझन या धोरणा अंतर्गत या आव्हानाला भिडण्यात येत असून या जटील प्रश्नाला भविष्यात योग्य उत्तर मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठांची पेन्शन, स्वयंसहाय्यता गट, दोन पिढ्यांमधील सुसंवाद आदी मुद्यांवर काम करीत आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य मानली गेलेली एकत्र कुटुंब पद्धती आणि परंपरेला स्मरून ज्येष्ठांचे आयुष्य अधिकाधिक आरोग्यदायी कसे होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

अधिक वाचा  टॅलेंट स्प्रिंटने गुगलच्या सहकार्याने केली महिला अभियंता कार्यक्रमाची घोषणा

यावेळी बोलताना डॉ. संजीव गुप्ता म्हणाले की, ज्येष्ठांच्या सशक्तीकरणासाठी शासकीय पातळीवर अनेक योजना असून या योजनांच्या योग्य प्रचार-प्रसाराव्दारे ज्येष्ठांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. ज्येष्ठ नागरिक अधिकाधिक स्वावलंबी आणि सक्षण होण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांव्दारे त्यांना तंत्रज्ञानाची तोंड ओळख करून दिली जाते. दैनंदिन जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा  त्यांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी उपक्रम घेतले जातात.

यावेळी बोलताना डॉ. अश्विनी पेठे म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यात शहरे अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पूरक अशी शहरांची रचना करणे आवश्यक असून केंद्र आणि राज्य सरकार तसेत स्थानिक संस्थांसह समाज यांची ही एकत्रित जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिक पूरक शहरांचा अभाव असल्याने भीतीपोटी घराबाहेर पडण्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या मर्याद येतात. या मर्यादांमुळे ज्येष्ठांमध्ये उद्विग्नता येऊ शकते. वाहनचालक आणि पादचारी यांना रस्त्यावर चालताना आपापली योग्य जागा मिळणे आवश्यक आहे. असे वातावरण मिळवून देण्यास यंत्रणा विकसीत झाल्यास शहरवासीयांच्या मनात शहारविषयी प्रेम आणि अभिमानाची भावना वृद्धींगत होते. सर्वसाधारणपणे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र असे दोन प्रकार आपल्याला ढोबळमानाने करता येतात. या दोन्ही स्तरांवर ज्येष्ठांना केंद्रस्थानी सेवा सुविधांची उपलब्धता करून दिली पाहिजे.

यावेळी बोलताना रोटेरीयन विनय कुलकर्णी म्हणाले की, रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेमार्फत ज्येष्ठांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. रोटरी इंटरनॅशनल ही एक जागतिक संघटना असून जागतिक आणि स्थानिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांसदर्भात धोरणात्मक दृष्ट्या कोणत्या उपाय योजना करता येतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 115 वर्षांची परंपरा लाभलेली , 200 देशात कार्यरत असलेली आणि साडेबारा लाखांहून अधिक सदस्य संख्या असलेली रोटरी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेशी निगडीत अनेक दिग्गज त्यांचा अमूल्य वेळ आणि संसाधने ही समाजासाठी खर्ची घालत आहेत. रोटरी फौंडेशन ट्रस्ट ही मोठ्या फौंडेशन पैकी एक असून हजारो कोटी रूपयांची कामे या ट्रस्टमार्फत केली जातात. चॅरिटी नेव्हीगेशनने याला फोर स्टार रेटींग दिले आहे. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि रोटरी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वगळता 185 देशांतून आपण पोलिओ सारख्या आजाराचे उच्चाटन केले आहे.

अधिक वाचा  सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) भारती हॉस्पिटलमध्ये सुरवात

यावेळी बोलताना डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, आध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते आईनस्टाईन असा हा धागा आध्यात्म ते विज्ञान गुंफला जातो. अवघ्या 16 व्या वर्षी चिंतनातून संत ज्ञानेश्वरांनी नऊ तत्वे मांडली. भारतीय संस्कृती आणि परंपरा ही महान असून 21 व्या शतकात भारत देशाचे नेतृत्व करेल हे स्वामी विवेकानंदांनी केलेले भाकीत आज सत्यात उतरत आहे. जागतिक पातळीवर या पृथ्वीची एक हजार वेळा राख करू शकतील एवढ्या विनाशकारी बॉम्बची निर्मिती करण्यात आली असताना भारत मात्र वसुधैव कुटुंबकमचा संदेश घेऊन वाटचाल करीत आहे. जागतिक स्तरावर शांतता प्रस्थपित करण्यासाठी भारताकडे आशेने पाहिले जात आहे. संपूर्ण विश्व एकाच तत्वाने आणि चैतन्याने भरलेले आणि भारलेले आहे. सृष्टीतील अणू आणि रेणूत चैतन्य सामावलेले आहे. हे अंतिम सत्य आपणास ठावूक आहे. हिंदू तत्वज्ञानाचा पाया भक्कम असून मानवी कल्याणाची क्षमता त्यात सामावलेली आहे. आपल्या देशातील सर्व धर्मग्रंथ हे केवळ धर्मग्रंथ नसून ते जीवनग्रंथ आहेत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love