पुणेः- बु्द्धी संवर्धन, व्यक्तिमत्व संवर्धन, नेतृत्व संवर्धन असे संवर्धनाचे अनेक पैलू असताना जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांवर अवमूल्य होत आहे. अशा वातावरणात ज्येष्ठांनी सक्रीयतेला त्यांच्या अनुभवाची जोड देत पुढील पिढीत मूल्य संवर्धन वृद्धींगत होईल, यादृष्टीने योगदान द्यावे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने दिनांक 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये आज ‘क्रियाशील वार्धक्य’ याविषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रघुनाथ माशेलकर बोलत होते.
यावेळी एस.पी. किंजवडेकर, लायन डॉ.शरदचंद्र पाटणकर आणि खिमजीभाई गाला यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने सन्मानित करण्यात आले.
जागतिक ज्येष्ठ नागरीक दिना निमित्त जनसेवा फाैऊंडेशनतर्फे आर.आर.टी.सी, केंद्र सरकारचा सामिजीक न्याय व सबलीकरण मंत्रालयातर्फे नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर सिनिअर सिटीझनच्या उपक्रमांतर्गत, सामाजिक विभाग महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, भारती योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग, एकता परिवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, आयएलसी इंडिया, आईस्कॉन, फेसकॉम, एस्कॉप आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, वयोवर्धन या क्षेत्राकडे डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी खूप दूरदृष्टीने पाहिले आणि राष्ट्रीय धोरणात या मुद्याचा समावेश करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ते या क्षेत्रातील माझे गुरू असून त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. वय वाढत जाणे ही एक नैसर्गिक प्रक्रीया आहे. त्यावर आपले नियंत्रण नाही. परंतु, मनाने ताजेतवाने राहणे हे संपूर्णतः आपल्या हातात आहे. त्यामुळे वयाच्या वाढत्या वयाचे दडपण किंवा अभिमान न बाळगता क्रीयाशील ज्येष्ठत्व व्यथित करणे, हे अधिक मोलाचे आहे. ज्येष्ठांना भावनिक आणि आर्थिक सुरक्षेसह एकाकीपणा ही एक मोठी समस्या भेडसावत आहे. डिजीटल युगामध्ये समाज माध्यमे हा एकाकीपणा दूर करण्यात सहाय्यभूत ठरत आहेत. या समाज माध्यमांमुळे ज्येष्ठांनी आपले एक आभासी काल्पनिक विश्व निर्माण केले असून ते त्यात कृतीशील, क्रीयाशील आणि सकारत्मकतेने गुंतत आहेत.
ज्या ज्येष्ठांना डिजीटल तंत्रज्ञान हाताळता येत नाही, अशांसाठी आमच्या आयएलसी (आय) अर्थात आंतरराष्ट्रीय वयोवर्धन केंद्र (भारत) या संस्थेतर्फे मोबाईल लिटरसी कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. मोबाईल लिटरसी प्रशिक्षणा बरोबरच त्यांच्या कल्पनेचे अवकाश विस्तारावे यासाठी ऑनलाईन काव्य स्पर्धा आणि निबंध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले.
अलीकडच्या धावत्या जीवनशैलीमुळे घरातील आणि समाजातील ज्येष्ठांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तरूण पिढीला वेळ मिळत नाही. अशावेळी ज्येष्ठांच्या भावना या मनातच तुंबून राहतात. या तुंबलेल्या भावनांचा निचरा होण्यासाठी या स्पर्धा आणि हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले. आपण वृद्ध झालो आहोत, आपली वाटचाल वृद्धत्वाकडे होत आहे, हे वास्तव सर्वप्रथम स्वीकराले पाहिजे. वृद्धत्व हे दुसरे बालपण असते या उक्तीनुसार लहान वयात आपण ज्या पद्धतीने खेळायचो, हसायचो, बागडायचो तेच खेळणे, हसणे, कृतीशील राहणे अशी जीवनशैली आपण अंगीकराली पाहिजे. तसेच आध्यात्मिक पर्यायांचा देखील विचार करीत आपल्या अंतर्मनाला प्रज्वलीत करून शांत, सुखी, समाधानी आणि समतोल आयुष्य जगावे. आपण वयाने म्हातारे व्हावे, मनाने नाही. जीवनाचे उद्दिष्ट आणि हेतू लक्षात घेऊन ते गाठण्याच्या दृष्टीने वाटचाल असावी. मानवी मनाच्या आणि कार्याच्या आकांक्षांना मर्यादा नसून तुमच्या आकांक्षांच्या कक्षा रुंदावत तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करावीत.
यावेळी बोलताना हेरिटेज मेडिकल सेंटर फौंडेशनचे के.आर. गंगाधरण म्हणाले की, भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस जटील होत असून ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि त्यातही ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या समस्या वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून ज्येष्ठांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणा-या प्रयत्नांना काही ज्येष्ठांकडूनच दुर्लक्षिले जाते. वॉकर्स, चष्मे, श्रवणयंत्रे, दातांची कवळी आदी साहित्याचे वाटप करूनही ते साहित्य न वापरण्याकडेच अनेकांचा कल असतो. थोड्याशा दुर्लक्षामुळे अपघातांना सामोरे जावे लागते आणि त्यातून इतर अनेक समस्या उद्भवतात. हे अपघात टाळण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सजगता वाढविणे गरजेचे आहे. पाश्चात्य देशांमध्ये सेन्सर्स सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत ज्येष्ठांचे आयुष्य अपघात आणि तणावरहित कसे होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धरतीवर भारतातील सामाजिक, आर्थिक आणि अन्य संदर्भांच्या कसोट्या लावून ज्येष्ठांचे आयुष्य अधिकाधिक सुखकर व्हावे म्हणून तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे.
यावेळी ‘ज्येष्ठांची दिर्घकालीन काळजी आणि आव्हाने’ या विषयावर बोलताना जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद शहा म्हणाले की, वर्षांमागून वर्ष जात असताना ज्येष्ठांची संख्या वाढत चालली आहे. कोविड काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीनेे त्यांना अनेक औषधोपचारांचे डोस घ्यावे लागत आहेत. तसेच त्यांचा आहारविहार बंदिस्त झाल्यामुळे ते निराशे सारख्या समस्येला सामोरे जात आहेत. ज्येष्ठांच्या व्यवस्थापनाचा खर्च वाढत असून त्यामुळे आर्थिक ताण येत आहेत. ज्येष्ठांच्या देखभालीसाठी ठेवण्यात येणारे केअर टेकर आणि कुटुंब यांच्यात संघर्षाचे प्रसंग उद्भवत असून हे प्रसंग टाळण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
यावेळी ‘ज्येष्ठांचे लसीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. संदिप तामाणे म्हणाले की, ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनता आणि दुर्लक्षितपणा दिसून येतो. मुलांना लहान वयात जितक्या जागृकतेने लसीकरण केले जाते, त्याविरूद्ध ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत उदासीनता बाळगली जाते. वाढत्या वयानुसार रोग प्रतिकारक शक्ती कमी होत जाते. अशावेळी वातावरणातील जंतू संसर्गामुळे ज्येष्ठांना किडनी, फुफ्फुसाशी संबंधित अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत जागृती दाखविल्यास जंतू संसर्ग टळू शकतो किंवा अगदी जंतू संसर्ग झालाच, तर त्याचे गांभीर्य कमी होऊ शकते, हे निर्विवाद सिद्ध झालेले आहे. ज्येष्ठांनी प्रामुख्याने फ्लू, निमोनिया, धनुर्वात आणि नागिण या आजारांशी संबंधिक लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. ज्येष्ठांना सुचविण्यात आलेल्या काही लसी सर्वसाधरणपणे वर्षातून एकदाच घ्याव्या लागतात. आजारांची गुंतागुंत आणि तीव्रता कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. कावीळ, मेंदूज्वर, विषमज्वर, रेबीज या लसीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे.
यावेळी लायन शरदचंद्र पाटणकर आणि खिमजीभाई गाला यांनी सन्मानार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. जनसेवा फौडेशनच्या रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.बी.टी. लावणी यांनी रिसर्च सेंटरतर्फे केल्या जाणा-या कार्याचा विस्ताराने आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात फेसकॉम आणि अॅस्कॉम यांनी मनोरंजनात्मक आणि ज्येष्ठांना प्रेरणादायी ठरतील असे कार्यक्रम सादर केले. यावेळी मधुरभाव या संस्थेच्या अंजली देशपांडे यांनी त्यांच्या संस्थेवर आधारित चित्रफीत दाखवली. या चित्रफितीव्दारे ज्येष्ठत्वामुळे डिमेन्शिया या आजारासह इतरही व्याधीग्रस्त ज्येष्ठांना सांभाळण्याच्या अनुभवावर विस्ताराने प्रकाश टाकला. गोकुळधाममधील आध्यात्मिक गुरूंनी मार्गदर्शन केले. जनसेवा फौडेशनच्या रिसर्च सेंटरचे चेअरमन डॉ. सुभाष साळुंखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.