पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते. तसेच मराठा उमेदवारांना तूर्तास वगळून नोकरभरती करण्याचे सूतोवाचही वडेट्टीवार यांनी केले होते. परीक्षा झालेल्यांबाबत मुख्य सचिव समिक्षा करतील. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश काढू. या नियुक्त्या करताना मराठा समाजाचा निर्धारीत कोटा अबाधित राहील याचा विचार केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या व्यक्तव्याचा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी समाचार घेतला आहे. वडेट्टीवार मराठा आरक्षणासंदर्भात जे काही बोलतात त्याला काडीचीही किंमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना ओबीसी नेता होण्याची घाई झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली.
ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वडेट्टीवार यांना ओबीसी नेता व्हायची घाई असल्याने ते काहीही बरळतात त्यामुळे त्यांचा बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे सांगत सध्या वडेट्टीवार आणि नाना पटोले या काँग्रेसीमध्ये ओबीसी नेता होण्याची चढाओढ लागल्याचा टोला त्यांनी लगावला. ना.अशोक चव्हाण यांच्याबद्दल आता बोलायला काही शिल्लक नाही त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या घाताला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच यापुढे जबाबदार धरणार याचे सूतोवाच त्यांनी केले.
खा.संभाजीराजे हे सध्या समाजासाठी चांगले काम करीत आहेत व मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना चांगल्या सूचना करीत आहेत. २७ तारखेस ते नक्की समाजाभिमुख भूमिका घेतील व आम्ही नक्की सोबत असू असेही ते म्हणाले.