पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या दोन ठिकाणी कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक झाला होता. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तर पुण्याचे स्थान देखील महत्वाचे आहे. असे असताना कोरोनाला रोखण्यात व पुरेशी उपाययोजना करण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केली.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काकडे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण न करता कोरोनाला रोखण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. परंतु, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवून कोरोनाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारसाठी देशातील सर्व राज्यांनादेखील मदत करायची असते. आपण राज्य म्हणून कोरोनावरील उपचाराची जबाबदारी घेणार की नाही? असा प्रश्न काकडे यांनी उपस्थित केला.
उत्तर प्रदेशाची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र विकसित राज्य आहे. त्यामुळे राज्य म्हणून आपण जबाबदारी घेतली पाहिजे. मोफत लसीकरणाची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आणि आता जागतिक निविदा काढणार म्हणून सांगतात. हे असं नुसतं बोलून चालत नाही. आता तिसरी लाट येणार म्हणून तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याला तोंड देण्यासाठी काय पूर्वतयारी काय केली आहे हे देखील महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असेही प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे म्हणाले.
ताळमेळ नसलेले सरकार महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक बोलतात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरं बोलतात. त्याचवेळी बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण वेगळंच बोलतात. यांच्यामध्ये एकवाक्यताच नाही. या तिघांनी किमान कोरोनाच्या निमित्ताने तरी एकत्र यावे. आणि महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या संकटातून वाचविण्याची नैतिक जबाबदारी पार पाडावी.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह उद्योग जिथे आहेत तिथला कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. उद्योग सुरू राहिले तर लोकांचे रोजगार टिकतील व सरकारला उत्पन्न मिळेल. आतासारखंच दुर्लक्ष कराल तर, उद्योग बंद पडतील आणि रोजगाराचे प्रश्न उपस्थित होतील. आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे भयानक प्रश्न निर्माण होतील, असेही काकडे म्हणले.