पुणे- ईडीचा कितीही आवाज केला तरी लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यांना अटक केली जात आहे. परंतु यातून काही निष्पन्न होणार नाही. यातून फक्त वातावरण निर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. लवकरच योग्य त्या गोष्टी पुढे येतील. परंतु, कारवाईमागे षडयंत्र तर नाही ना ?अशी शंका घ्यायला वाव असल्याचे आमदार रोहीत पवार म्हणाले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने दिली आहे. यासंबंधी आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार पवार म्हणाले, एक हजार कोटींचा आकडा कोणी व कसा काढला. आयटी विभागाच्या कारवाईबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी यापूर्वीच त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्यावर किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर ही कारवाई होते आहे, परंतु यातील योग्य त्या गोष्टी लवकरच पुढे येतील. सत्तेतील लोकांच्या विरोधात यंत्रणाचा वापर केला जात आहे. दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. त्या हेतूतून या गोष्टी होत आहेत.
भाजपचा एखादा मोठा नेता जेव्हा मंत्री खिशात आहेत, असे वक्तव्य करतो, त्या अर्थी इडी त्यांच्या खिशात असू शकते. परंतु आपण आज नांदेडची पोटनिवडणूक बघितली तर लोकशाही त्यांच्या खिशात नाही, हे स्पष्ट होत आहे. इडीचा त्यांनी कितीही आवाज केला तरी लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यांना अटक केली जात आहे. परंतु यातून काही निष्पन्न होणार नाही. यातून फक्त वातावरण निर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. बिहार निवडणूकीपूर्वी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातून असाच प्रकार करण्यात आला होता. माजी मंत्री अनिल देशमुख यांना बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही, हे चुकीचे आहे. अधिकाऱयांना पुढे करत मागे कोणी सुत्रधार आहे का, याची शहानिशा केली पाहिजे. एखादा मोठा विषय जर वेगळ्या पद्धतीने वाजवला जात असेल तर त्यामागे हुशार लोक असतात. हे हुशार लोक नेमके कोण हा मोठा प्रश्न आहे. त्यासंबंधी आता माझा अभ्यास कमी पडतो आहे असेही पवार म्हणाले.
मंत्री नवाब मलिकांनी वानखेडेंनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केल्याच्या मुद्द्यावर आमदार पवार म्हणाले, हा मोठ्या नेत्यांचा प्रश्न आहे, मी एक साधा आमदार आहे. मोठ्या नेत्यांसंबंधी काही पुरावे माध्यमांतून येतील, त्याचवेळी मलाही त्याची माहिती मिळणार आहे. त्यावरूनच मला खरे-खोटे कळू शकेल.परंतु मलिक व फडणवीस यांच्यात झालेल्या एकमेकांवरील आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे मला माहिती नाही. मलिक यांनी वानखेडे प्रकरणाबाबत अभ्यास केला आहे, म्हणूनच ते माध्यमांतून मुद्दे मांडत आहेत. प्रत्येक बाबीला ते पुरावे देत आहेत.
पवार कुटुंबियांशी संबंधितांना घेरण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, त्याशिवाय बातमी कशी होणार? पवार कुटुंब तसेच शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांवर आरोप झाले, त्यांच्या विरोधात कारवाई केली तर त्याच्या बातम्या होणार आहे. त्यानंतरच भाजपचे प्रवक्ते असणाऱया मंडळींना टीव्हीवर झळकता येईल. जेव्हा त्यांच्या एखाद्या व्यक्तिसंबंधी एखादा विषय येतो, त्यावेळी ते शांत असतात. मग राज्यातील विविध जातींचे आरक्षणाचे प्रश्न, केंद्राकडून अनेक वर्षांपासून येणे असलेले ३५ हजार कोटी रुपये याविषयावर ते बोलत नाहीत. राजकिय पोळी जेथे भाजतेय तेथे ते बोलत आहेत. अशा कारवाया जेवढ्या तीव्र होतील तेवढे महाविकास आघाडीतील घटक पक्ष मजबूतीने एकत्र येतील. जनता हे सगळे बघते आहे, येणाऱया निवडणूकांमधून जनता त्यांना दाखवून देईल. काहीही करून सत्तेत यायचे एवढेच भाजपचे ध्येय दिसते आहे, असेही पवार म्हणाले.