आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका- का आणि कोणाला म्हणाले असे उद्धव ठाकरे?

राजकारण
Spread the love

पुणे — काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही कोरोना तसा गेलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिवाळीनंतर राज्यात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला. आज उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी बारामतीमधील इन्क्युबेशन सेंटरच्या उद्धाटनाला हजेरी लावली. त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर खोचक शब्दांमध्ये टोलेबाजी केली. तसेच, फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्याचा देखील समाचार घेत त्यावर टोमणा मारला.

इन्क्युबेशन सेंटरचे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला ५० वर्षांपूर्वीची बारामती माहिती आहे काय होती. पवार साहेबांनी दगडालाही पाझर फोडून दाखवला. परदेशात जाऊन तेथील गोष्टी माझ्याकडे झाल्याच पाहिजेत आणि ते मी करणार, ही वृत्ती असायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी जाताजाता आभार मानताना देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. येथे येण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही कोरोना तसा गेलेला नाही. सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्हीही नको ती अंडी उबवली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपवर खोचक शब्दांत टोलेबाजी केली. जिद्द हवी, बदल सगळीकडे घडू शकतो, हे येथे दिसून आले. मनातल्या मनात मी विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. २५-३० वर्ष आम्हीही उघडले होते. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचे पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपले काम आपण केले. पुढे काय करायचे हे त्यांनी ठरवायचे असते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी यावेळी अजित पवारांच्या एका विधानाचा संदर्भ देताच व्यासपीठावर बसलेल्या अजितदादांनी त्यांना हटकले. उद्धव ठाकरे म्हणाले, येताना मला अजित पवार म्हणाले की बारामती हे आता पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे केंद्र बनेल, तेवढ्यात अजित पवारांनी त्यांना हटकून “शिक्षणाचे” अशी मिश्किल सुधारणा सुचवली! यावरून सभागृहात हशा पिकताच मुख्यमंत्री म्हणाले, हो शिक्षणाचे आणि राजकारणाचेही आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी येथे शिकवल्या जातात. आपण आपले मिळून धडा शिकवण्याचे काम करू!

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *