६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन : कुस्तीगिरांचा सर्वांगीण विकास सरकारच्या प्राधान्यावर- चंद्रकांत पाटील

क्रीडा महाराष्ट्र
Spread the love

पुणे–“आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. कोथरूड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. उद्घाटनाची कुस्ती माती विभागातील ८६ किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले व पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडे यांच्यात झाली. अभिषेक परीवले याने १४-४ अशा गुणांच्या फरकाने लोखंडेवर विजय मिळवला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, अभिनेत्री दिली सय्यद, अभिनेते प्रवीण तरडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उद्योजक सूर्यकांत काकडे, प्रवीण बढेकर, विशाल गोखले, विशाल चोरडिया यांच्यासह कुस्ती संघटनांचे, शहर भाजपचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय वस्ताद दामोदर लक्ष्मण टाकले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुरलीधर मोहोळ यांच्या कल्पनेतून भव्यदिव्य स्वरूपाचे हे आयोजन झाले आहे. आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. जेणेकरून कुस्ती न खेळणाऱ्यांनाही कुस्ती खेळण्याचा मोह होईल. खेळाडूंची सर्व व्यवस्था चोखपणे केली आहे. १४ तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कुस्तीगिरांसाठी चांगल्या घोषणा करतील.”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेतील विजेत्या खेकाडूंच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करणार आहे. अशा स्पर्धांमुळे मोबाईल, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना अशा पद्धतीच्या आयोजनामुळे खेळाकडे आकर्षित करू शकणार आहेत.”

प्रास्ताविकात मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबीयांकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आली. मोठ्या आनंदाने आम्ही आयोजनास सुरुवात केली आणि असंख्य मदतीचे हात पुढे आले. ४५ संघातून ९५० पेक्षा अधिक कुस्तीगीर सहभागी झाले आहेत. पुढील पाच दिवस चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महिन्द्रा थार, ट्रॅक्टर व जावा गाड्यांसह रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. कुस्तीला प्रोत्साहन देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. रामदास तडस यांनीही कुस्तीगिरांसाठी विविध मागण्या मांडल्या. राज्य सरकराने कुस्तीगिरांच्या विकासासाठी निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

——————————

आशिष तोडकर, सुरज अस्वले, स्वप्नील शेलार,

प्रतिक जगताप, ओंकार भोईर यांची विजयी सलामी

बीडच्या आशिष तोडकर, कोल्हापूरच्या सुरज अस्वले, पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार यांनी ५७ किलो गटातून तर, पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप, कल्याणच्या ओंकार भोईर, जळगावच्या ऋषिकेश वैरागी यांनी ८६ किलो वजनी गटातून आपापल्या प्रतीस्पर्धीना पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.

८६ किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले याने पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडेला १४-४ असे पराभूत केले. कोल्हापूरच्या ऋषिकेश पाटीलने गिरीधर डुबेला ४-० असे पराभूत केले. जळगावच्या योगेश वैरागीने अमरावतीच्या विवादासला चीतपट करताना आगेकूच केली. कल्याणच्या ओंकार भोईरने चंद्रपूरच्या फैजान शेखला १०-० असे पराभूत केले. पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापने सांगलीच्या भरत पवारवर ७-६ अशी मात केली.

५७ किलो वजनी गटात बीड आशिष तोडकरने कोल्हापूर शहरच्या अतुल चेचर याला ९-४ असे एकतर्फी पराभूत केले. याच गटात कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने जळगावच्या यशवंतवर ११-० अशी मात करताना आगेकूच राखली. पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारने नागपूरच्या अंशुल कुंभारकरला थेट चीतपट केले. यवतमाळच्या यश राठोडने नाशिकच्या समर्थ गायकवाडला १२-५ असे पराभूत केले. भंडारा जिल्ह्याच्या अतुल चौधरीने रत्नागिरीच्या भावेशला १०-० असे एकतर्फी पराभूत केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *