पूजा वनदुर्गांची : अन्नमाता ममताबाई भांगरे

महाराष्ट्र लेख
Spread the love

नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या स्वयंप्रेरित ‘वनदुर्गां‘ची आपणास माहिती नसते. नवरात्रीच्या निमित्ताने अशाच काही वनदुर्गांचा परिचय…

🔹अन्नमाता ममताबाई भांगरे🔹

शेतात एखादे रोपट रुजायला काही कालावधी लागतो. ते रुजत असताना त्याची ममतेचे काळजी घेणे तितकेच आवश्यक असते. कारण त्यातून अंकुरणाऱ्या झाडातून पुढील पिढीला सकस आहार मिळणार असतो आणि ती आरोग्यसंपन्न होणार आहे. या तळमळीतून बियाणांतील सकसता आणि सात्विकता जपण्याचे कार्य करत आहेत ममताबाई भांगरे…

—-

ममताबाई भांगरे हे नाव तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात  गाजतेय! कोण आहेत ममताबाई? त्यांच्या घरी जाण्याचा  योग आला आणि त्यांना सुद्धा कल्याण आश्रमाच्या अकोले येथे जानेवारी २०२० मध्ये झालेल्या महिला अभ्यास वर्गात आपण बोलावले होते. वनवासी कल्याण आश्रमाने केलेल्या सत्कारानंतर त्यांचे बऱ्याच ठिकाणी सत्कार झालेत, बरेच पुरस्कार त्यांना मिळाले.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे राहणाऱ्या ममताबाई देवराम भांगरे.  निरक्षर महिला सेंद्रिय शेतीसाठी सर्वांना एक आदर्श उदाहरण घालून देऊ शकते, हे महत्त्वाचे.त्यांना अन्नमाता म्हणतात.  या नावातच किती अर्थ दडलाय, नाही का? जे अन्न आपण शेतात पिकवतो, त्यासाठी वाटेल ते कष्ट करतो, त्या पिकांवर, त्या बियांवर मनापासून प्रेम करतो, पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने त्या छोट्या “बी” वर संस्कार करून, लहान मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतो.  या असंख्य बिया काळ्या आईमध्ये रुजतात, त्याला अंकुर फुटतो, हळूहळू त्याचे रोपटे, झाड होते, फळे,फुले आणि अवर्णनीय बहर येतो. तो आनंद अविरत कष्ट करून मिळविला असतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे, रात्रीचा दिवस करून, रक्षण करून त्याला जगवले असते.

हे करतं कोण, सगळेच शेतकरी करतात परंतु ममताबाईंची कथाच काही न्यारी आहे!! म्हणून त्यांना अन्नमाता म्हटले आहे!!

वसा सासूबाईंचा

बीज रक्षण, संगोपन, संवर्धन आणि रोपण याचा वारसा सासूबाईंकडून मिळाला आहे,असे त्या अभिमानाने सांगतात. त्यांना दोन सासूबाई होत्या. सासूबाई  सुनेला नेहमी सांगायची की नैसर्गिक शेती केली पाहिजे. घरासमोर भरपूर फळं, फुलं यांची झाडं लावली पाहिजेत. रानभाज्यांची जपवणूक केली पाहिजे. त्यापासून होणारे फायदे लक्षात घेऊन तो वारसा आपण टिकवला पाहिजे. या सर्वांवर मात म्हणजे, “सूनबाई,यातलं काही विकू नकोस,बरं का.” असे सांगताना ममताबाईचे डोळे भरून येतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत परंतु ते पाहायला त्यांच्या सासूबाई या जगात नाहीत,याचे त्यांना वाईट वाटते. सासूबाईंनी आईच्या मायेने ममताबाईंना जपले. सेंद्रिय शेतीची प्रेरणा दिली. कोणत्याही पुरस्काराने त्या भारावून जात नाहीत. अजूनही त्यांचे पाय घट्ट जमिनीवर आहेत!

परंपरा जपण्याचा ध्यास

त्यांच्या अंगणात बरीच रोपे आहेत. त्यात तुळस, गवतीचहा, सीताफळ, पेरू, पानफुटी, कोरफड अशी बरीच….रोपे भेट  देताना, त्याविषयी अन्नमाता सांगतात, “कुणाच्या जीवावर मोठे होऊ नका. रानभाज्या, कंदमुळे जतन करून ठेवली पाहिजेत व त्याचे औषधी गुण समजून घेतले पाहिजे.”

माहितीचा खजिना

केवळ पावसाळ्यात निघणाऱ्या रानभाज्या कुर्डु, चाईचबार, अळू, खुडघेवडा, चिचूरडे या कायम बाराही महिने शेतात कशा राहतील यासाठी त्या प्रयत्नरत असतात.  मोहाच्या फुलांचे त्यांनी अनेक उपयोग सांगितले. मोहाच्या फुलांची खीर छान होते. गोड भजी छान लागतात शिवाय ही फुले नाचणीच्या पिठात टाकून याची आंबील उत्तम होते! कितीतरी झाडांचे, फुलांचे उपयोग, औषधी गुण त्या सांगत होत्या. या सगळ्या झाडांच्या योग्य मशागतीसाठी  गांडूळखत, जिवांमृत आणि शेणखत याचा त्या उपयोग करतात, त्यांच्या अंगणात २ बैल आहेत. त्या शेणापासून बायोगॅस तयार केलाय. शेतीत आलेला आंबेमोहोर, रायभोग, काळभात हा तांदूळ वर्षभर टिकून राहण्यासाठी माती व शेण याचा उपयोग करून कणग्यामध्ये ठेवलाआहे. वांगे, सुरण, डांगर, करडई, नागली पुन्हा शेतात लावण्यासाठी ही सगळी असंख्य बियाणं खराब होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारे त्या जतन करून ठेवतात. कुणी मागितलं तर लगेच देतात.

त्यांच्या घरासमोरच तोरण म्हणून काही बीजतुरे लटकवले आहेत, शहरात चिमण्या आजकाल फारशा दिसत नाहीत,इथे मात्र त्या तुऱ्यांमधील दाणे चिमण्या सहजपणे खाताना दिसतात. त्यांना विचारले, तुमच्या या बिया कमी नाही होणार का, चिमण्यांनी खाल्यात तर? त्या म्हणतात, त्यांचाही हक्क आहे त्यावर! जशी रोपे त्यांच्या अंगणात आहेत तसे मांजर, कुत्रा, कबुतरे, कोंबड्या, चिमण्या असे माणसाळलेले पक्षी -प्राणी देखील मुक्तपणे विहार करताना दिसतात.

त्यांचे काम एवढे मोठे आहे की आयआयटी,आयआयएम मधले प्राध्यापक, विद्यार्थी ममताबाईंकडून व्यवस्थापन व  संशोधनाचे धडे घेऊन सेंद्रिय शेतीतील त्यांनी केलेल्या  प्रयोगांचा अभ्यास करत आहेत. ममता बाईंना नुकताच उंच माझा झोका हा पुरस्कार मिळाला. याशिवाय शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सह्याद्री संकल्प अभियान अशा अनेक संस्थांकडून

ममताबाईंना  पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या कामात पती देवराम भांगरे यांची मदत होते. त्यांना ३ मुली व १ मुलगा आहे.

प्रेमळ, निगर्वी, कष्टकरी अन्न मातेला, वनकन्येला, एका सक्षम शेतकरी महिलेला सादर प्रणाम.

🔹वैशाली देशपांडे 🔹

पश्चिम क्षेत्र महिला कार्य सहप्रमुखं वनवासी कल्याण आश्रम

( विश्व संवाद केंद्र, पुणे)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *