पुणे— विठ्ठल भक्तीने भिजला दिवे घाट ।
जाहली सोपी वाट । पंढरीची ।।
दिंडय़ादिंडय़ातून होणारा विठुनामाचा घोष…अन् टाळ-मृदंगाचा झंकार…….अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाने विठुनामाच्या बळावर नयनरम्य दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे शुक्रवारी लीलया पार केली…आणि सायंकाळी माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली.
संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणेकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंतःकरणानेच पुणेकरांनी पालखीला निरोप दिला. हडपसर येथे दोन्ही पालख्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा व तुकोबांच्या पादुकांवर माथा टेकवत भाविकांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला.
माउलींचा पालखी सोहळा टाळ-मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात दिवेघाटाच्या दिशेने निघाला. वडकी येथे पालखीने दुपारचा विसावा घेतला. तेथे ग्रामस्थांतर्फे पालखीचे भक्तिभावात स्वागत झाले. त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. दुपारच्या सुमारास वैष्णवांच्या महामेळय़ाने घाटात प्रवेश केला. माउलींची पालखी थाटात दिवेघाटातून मार्गक्रमण करू लागली. तसा विठुनामाचा गजर टीपेला पोहोचला. रथ दौडू लागला. पालखीसवे वारकरीही धावू लागले. वरूणराजानेही या सुरात सूर मिसळले. अवघा दिवे घाट विठुनामात दंग झाला. दिवेघाटाच्या परिसस्पर्शाने आत्मिक बळ प्राप्त झालेल्या वारकऱयांनी घाटाची ही अवघड चढण सहजगत्या पार केली. पाच-साडेपाचच्या सुमारास पालखी घाटमाथ्यावर पोहोचली. सायंकाळच्या सुमारास माउलींची पालखी संत सोपान महाराजांच्या सासवडनगरीत विसावली. तेथे सासवडकरांनी पालखीचे अतिशय भक्तिभावात स्वागत केले.
तुकोबांची पालखी ‘लोणी’त
दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमार्गे लोणी काळभोर मुक्कामी दाखल झाली. लोणीत ग्रामस्थांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. तुकोबांच्या पादुका दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली.