पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २७ जानेवारीला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. केंद्राच्या एनआरसी आणि सीएए कायद्याला जसा मुस्लीम समाजाने विरोध केला तसा कृषी कायद्यांना विरोध असल्याचे मुस्लीम समाज दाखवून देईल असे आंबेडकर म्हणाले.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत एनआरसी आणि सीएए या कायद्यांच्या विरोधात शाहीनबाग येथे आंदोलन सुरु असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांनी केवळ शाब्दिक पाठींबा दिला, त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही असा आरोप करून आंबेडकर म्हणाले, अशा काळात पंजाबमधून शिख समाज व पंजाबी माणूस दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जत्था घेऊन चालत आला होता.
त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मुस्लीम समाजाचा कृतीशील पाठींबा दर्शवण्यासाठी यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत मुस्लीम समाजाचे मौलवी, मुफ्ती यांची बैठक घेतली आहे. एनआरसी आणि सीएए विरोधात जसे आंदोलन करण्यात आले त्याच धर्तीवर हे आंदोलन केले जाईल असे त्यांनी सांगितले. केवळ धार्मिक मुद्द्यावर नाही तर शेतीच्या प्रश्नावरही आंदोलन करेल असा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
[