सध्या अनेक कारणांमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे- डॉ. विश्राम ढोले

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- सध्या अनेक कारणांमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, समाजमन साशंक झाले आहे ही काळजीची गोष्ट असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमे व संज्ञापण अभ्यास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विश्राम ढोले यांनी व्यक्त केले. राष्ट्रातल्या लोकांविषयी, व्यवस्थांविषयी असणारा  विश्वास ही राष्ट्र संकल्पनेत अतिशय महत्वाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टच्या (SMART) वतीने आयोजित माध्यम संवाद परिषदेमध्ये ‘माध्यमांतील स्थित्यंतरे’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापण व वृत्तपत्र विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय तांबट, सहारा समय या वृत्त वाहिनीच्या पुणे ब्यूरो चीफ सौ. प्रतिभा चंद्रन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टचे देवदत्त भिंगारकर हे माध्यम तज्ज्ञ या परिसंवादात सहभागी झाले होते. या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संतोष कुलकर्णी हे उपस्थित होते. स्कूल ऑफ मीडिया आर्टच्या संचालिका राधिका इंगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

डॉ. विश्राम ढोले यांनी माध्यमांचे स्थित्यंतर हि दीर्घकालीन प्रक्रिया असल्याचे यावेळी विषद केले. ते म्हणाले, ९० च्या दशकात माध्यमात प्रचंड आणि महत्वाचे बदल झाले. तंत्रज्ञान, आशयाची धाटणी, माध्यमातील आर्थिक व्यवस्था आणि लोकांकडून माहिती ग्रहण करण्याची पद्धत ह्या चार मुख्य गोष्टींनी माध्यमात बदल घडवून आणला आहे.

आताच्या समाज माध्यमाच्या काळात माध्यमात आलेल्या गोष्टीची चर्चा ही एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांमध्ये होते आणि जास्तीत जास्त लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी वाव मिळतो. माध्यमात प्रसिद्ध केलेल्या कन्टेन्टच्या नियमनासाठी आपल्याकडे असलेले कायदे आणि नियम हे तोकडे असून त्यावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण आहे असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात अल्गोरिदमद्वारे लोकांना नियंत्रित करण्याचा धोका वाढत आहे. आपण स्क्रीनचे ऍडिक्ट होत असल्याची भीती आणि  त्यावर उपाय शोधण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

डॉ. संजय तांबट यांनी प्राचीन काळापासून माध्यमांत झालेल्या बदलांची महिती देत स्वातंत्र्य चळवळीत माध्यमांचे योगदान, जागतिकीकरणाचा माध्यमांवरील परिणाम, वृत्त माध्यमे, रंजन माध्यमे ते आजचे सोशल मेडिया, ओटीटी, असा माध्यमांचा झालेला प्रवास कथन केला.

प्रतिभा चंद्रन म्हणाल्या, माध्यमात काम करणाऱ्या लोकांनी लाईफ लॉग लर्नर (LLL ) असले पाहिजे तरच काळाबरोबर टिकून नवीन पिढीबरोबर काम करू शकतो. निर्मितीत आशय नसेल तर तंत्रज्ञानाला अर्थ नाही. आजचे वर्तमानपत्र हे भविष्यकाळात इतिहासाचा दस्तावेज असते. त्यासाठी आशय हा महत्वाचा असून माध्यमातील लोकांनी कोणतीही गोष्ट प्रसिद्ध करण्याआधी आपण हे बरोबर करतो आहोत का असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. अन्यथा, उथळपणा लोकांसमोर येतो.

मी निर्माण करत असलेल्या गोष्टीत माझ्या वाचकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी काय देतोय ह्याकडे अतिशय गांभीर्याने बघणारी दृष्टी येत नाही तोवर त्यात सकसपणा येणार नाही. बराचसा कन्टेन्ट हा उथळ आणि लिन फॉरवर्ड स्वरूपाचा असतो. तो फार काळ टिकत नाही. लिन बॅकवर्ड स्वरूपाचा कन्टेन्ट हा सकस आणि चिरकाल टिकणारा असतो. पत्रकारांनी प्रतिक्रियावादी होऊ नये. केवळ कव्हरपेज पाहून पूर्वग्रहांच्या आधारे प्रतिक्रियात्मक बातमी न देता माहिती तपासून घेणे हे महत्वाचे आहे. वस्तुस्थितीच्या आधारे तपासून न घेता बातमी दिली तर चुकीची माहिती पसरण्याचा धोका असतो. अशा फेक न्यूज संदर्भात लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये सुद्धा साक्षरता निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

देवदत्त भिंगारकर म्हणाले, सन २००२ सालापासून भारतात विकसित झालेल्या एफएम रेडिओ मुळे  रेडिओ माध्यमात मोठी क्रांती झाली. या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानामुळे अनेकांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पॉडकास्ट हा प्रकारही लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यात स्पर्धेमुळे आशय संपन्नता येऊ लागली आहे. डेटा स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना ऍक्टिविस्ट होण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची घाई झाली असून हे योग्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.  

सध्या माध्यमांमध्ये उभी फूट पडलेली आहे – संतोष कुलकर्णी

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संतोष कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना, भारतीय माध्यमातील बदलाची प्रामुख्याने मोदींच्या आधीची म्हणजे २०१४ पूर्वीची माध्यमे आणि २०१४ नंतरची माध्यमे अशा दोन कालखंडात विभागणी केली. २०१४ पूर्वी भारतीय माध्यमात डाव्या विचारसरणीच्या लोकांचे प्राबल्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यानंतर डाव्या विचारसरणीला बळी पडलेल्या माध्यमकर्मींनी स्पष्टपणे व्यक्त होणे सुरु केले. सध्या माध्यमांमध्ये उभी फूट पडलेली असून त्यांच्यात संघर्ष सुरु आहे. ही घुसळण पुढची १०-१५ वर्षे सुरु राहील आणि त्यानंतर पुन्हा माध्यमांमध्ये वस्तुनिष्ठता परत येईल असा अंदाज त्यांनी वर्तवला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या तरुणांच्या राष्ट्रवंदना समूहातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी, सूत्र संचालन अमृता कावरे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील खेडकर यांनी मानले. डॉ. शुभंकर यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *