सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय – मुरलीधर मोहोळ


पुणे – काळाजी गरज ओळखून पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारण्यात येत असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन अद्ययावत असे जागतिक दर्जाचे रंगमंदीर साकार होणार आहे. शिवाय शहराची अस्मिता असणाऱ्या ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासात सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सादरीकरणानंतर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचेही मोहोळ म्हणाले.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘आपल्या शहरातील बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि देखरेखीखाली हे रंगमंदिर उभे राहिले. आपली कला सादर करण्याची एकतरी संधी बालगंधर्वला मिळावी हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. ५४ वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्वला नव्याने उभारण्याची आणि व्यापक करण्याची गरज असल्याचेही लक्षात आले. ही बाब लक्षात घेऊन २०१८ साली स्थायी समितीचा अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली’.

अधिक वाचा  गज गवाक्ष कुंडात झाले मंडईच्या गणरायाचे विसर्जन : विसर्जन सोहळ्याचे व्हिडिओ बघा

‘कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीत पुनर्विकासाचा विषय काही वेळ बाजूला राहीला, तरीदेखील आपण या विषयाचा पाठपुरावा करत पुण्यातील ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, मनपा अधिकारी आणि वास्तुविशारद या सर्वांची एकत्रित समिती नेमून या विषयावर सर्वांगाने चर्चा घडवून आणली, ज्यात पुनर्विकासाबाबत सकारात्मक कल दिसून आला’, असेही महापौर म्हणाले.

 ‘केवळ साडे २२ हजार स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडेतीन लाख स्क्वेअर फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. आज जेमतेम १०० दुचाकी व २०-२५ चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता आहे. परंतु नवीन वास्तूमधे ९०० दुचाकी व जवळपास २५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन एक ऐवजी आता १०००/५००/३०० इतक्या आसन क्षमतेची तीन नवीन प्रेक्षागृह उभी राहणार आहेत, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.

अधिक वाचा  मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली - शरद पवार

‘बालगंधर्वमध्ये आजच्या घडीला केवळ एक ५०० फुटाचे कलादालन उपलब्ध आहे. परंतु ह्याच नव्या वास्तूमध्ये आता सुसज्ज असे १० हजार फुटाचे एक आणि प्रत्येकी ५ हजार फुटाची दोन, अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे आणि ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. पुणेकरांना अभिमान वाटावा, अशाच प्रकारचे नवीन बालगंधर्व रंगमंदिर आता उभे राहणार आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

 व्यापारी संकुल हा अपप्रचार : मोहोळ

बालगंधर्वचा पुनर्विकास करताना त्यात व्यापारी संकुल असेल, अशा अपप्रचार काहींकडून जाणीवपूर्वक केला जात असून यात काडीचेही तथ्य नाही. केवळ विरोधाराला विरोध म्हणून हा खोटा प्रचार केला जात आहे. कारण या पुनर्विकास प्रकल्पात एक इंचही बांधकाम व्यावसायिक कारणासाठी नसेल, असेही माजी महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love