बारा हजार बाळांना मिळाली ‘एनआयसीयू’ची संजीवनी : ससून रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला पाच वर्षे पूर्ण


पुणे : “अत्याधुनिक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन आणि समर्पित भावाने काम करणाऱ्या सिस्टर्स, स्टाफ आणि डॉक्टर्स या सर्वांच्या मेहनतीने गेल्या पाच वर्षात बारा हजार बाळांना नवसंजीवनी मिळाली आहे. जन्म आणि मृत्यूच्या दाढेतून सुटका करणारा हा शिशु विभाग सातत्याने क्रियाशील आहे. आपल्या बाळाच्या पुनर्जन्माचा आनंद मातांच्या चेहऱ्यावर पाहून समाधान वाटते,” असे प्रतिपादन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या सहाय्याने २०१७ मध्ये ससून रुग्णालयातील बालरोग विभागात नवजात शिशु अतिदक्षता केंद्र (एनआयसीयू) उभारण्यात आले. या ‘एनआयसीयू’ला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागातर्फे आनंद साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनी अनेक पालकांनी आपल्या मुलांसमवेत रुग्णालयाला भेट दिली.

अधिक वाचा  एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन एसीबीच्या जाळ्यात

यावेळी डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव, विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, पुष्पा मारकड, मुकुल माधव फाउंडेशनचे यास्मिन शेख, जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते. ‘एनआयसीयू’मधील सर्व डॉक्टर्स, परिचारिका यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. उपस्थित पालकांनी सर्वांचे आभार मानले. ससून तर्फे या पालन स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. विनायक काळे म्हणाले, “रुग्णालय हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. येथे जन्म व मृत्यू होतो. ‘एनआयसीयू मध्ये एक प्रकारचा पुनर्जन्म होतो. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या पुढाकारातून मुकुल माधव फाउंडेशन व दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या सहकार्याने हे शक्य झाले. या पाच वर्षात येथे कार्यरत नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स आणि बालकांच्या माता या सगळ्यांचे योगदान मोलाचे आहे.”

अधिक वाचा  आंतरमहाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, “कोणतीही चांगली गोष्ट टीमवर्कमुळे उत्तम होते. प्रत्येकाच्या योगदानामुळेच हजारो बालकांना सक्षम बनवण्यात यश आले. ७० सतर्क व हुशार स्टाफ ५९ बेड्स या विशेष गोष्टी येथे असून, भारतातील एक सर्वोत्तम असे हे एनआयसीयू आहे. ससून रुग्णालयातील आरोग्यसेवेवर लोकांचा विश्वास दृढ होत आहे, याचा आनंद आहे. महाराष्ट्र शासनाने या युनिटला राज्यातील सर्वोत्कृष्ट युनिट म्हणून मान्यता दिली आहे.”

व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “समाजाच्या आरोग्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाऊंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे. ससूनमधील विविध विभागाचे आधुनिकीकरण करत आहोत. ‘एनआयसीयू’च्या माध्यमातून बालकांना सक्षम करता आल्याचा आनंद आहे. समविचारी देणगीदारांच्या पाठिंब्याने नेत्र चिकित्सालय, डेंटल लेझर युनिट स्थापन केले. ससून हे लेझर युनिट असलेले हे पहिले सरकारी रुग्णालय आहे. दीड  हजाराहून अधिक रुग्णांनी सेवांचा लाभ घेतला असून ५० हून अधिक रुग्णांवर दंतरोपण यशस्वी झाले आहे. याशिवाय, आपत्कालीन ट्रॉली बेड, बेडस्प्रेड असलेली गादी, उशांसह ब्लँकेट, चादरी (सोलापुरी चादर) आणि बरेच काही दान केले आहे. त्याचप्रमाणे एप्रिल २०१८ मध्ये अत्याधुनिक यकृत प्रत्यारोपण युनिटची स्थापना करण्यात आली. अशी स्थापना करणारे हे पहिले सरकारी रुग्णालय आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love