Citizens benefit from Mohol's effective system

दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’ : मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–मतदानासाठी नागरिकांच्या ‘उत्साहा’बाबत सातत्याने चर्चा होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयातून आजपर्यंत दोन लाख मतदारांनी व्होटिंग स्लिप प्राप्त केल्याची माहिती समोर येते आहे. मोहोळ यांची उमेदवारी सर्वांत आधी जाहीर झाल्याने योग्य वेळी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करता आली, असे प्रचार समन्वयक निलेश कोंढाळकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या डेटाबेसनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन व्होटिंग स्लिप मिळविण्यासाठी आम्ही महिनाभरापूर्वीच विशेष हेल्पलाईन सुरू केली. तसेच मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी सर्व प्रचारसाहित्यावर क्यूआर कोड छापण्यात आला. पुण्यातील नागरिक मतदानासाठी उत्सुक असून आणि मतदार स्लिप मिळवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. हेल्पलाईनवर संपर्क करीत, कार्यालयात प्रत्यक्ष येऊन स्लिप घेऊन जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही मोठे आहे. गेल्या ३० दिवसांत या यंत्रणेतून किमान दोन लाख नागरिकांनी स्लिप घेतल्या आहेत.”

मतदानास अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने आता घरोघरी जाऊन मोबाईल प्रिंटरच्या आधारे स्लिप वाटपाचे कार्य सुरू असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज काम करीत असल्याचे कोंढाळकर यांनी सांगितले.

कोथरूडमधील ३८ हजार मतदारांची नावे वगळली?

व्होटिंग स्लिपसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात संपर्क साधणाऱ्या अनेक नागरिकांना आपले नाव मतदारयादीत नसल्याचे लक्षात येत आहे. गेल्यावेळेस मतदान केलेल्या कोथरूडमधील सुमारे ३८ हजार मतदारांची नावे यावेळेस वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाने यादीतील नाव, छायाचित्र, पत्ता इत्यादींसंदर्भात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या आवाहनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क गमवावा लागत आहे, अशी हळहळ राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे. याविषयी निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *