पुणे— मराठा समाजाने आत्तापर्यंत संविधानिक मार्गाने (In a constitutional way) आपल्या हक्कासाठी आंदोलने केली आहेत.मराठा समाजाने जगाला हेवा वाटावा असे क्रांती मोर्चे देखील संविधानाला धरूनच काढले.परंतु, ती मराठा समाजाची कमजोरी समजून मराठा समाजाला गृहीत धरू नये. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचीही तयारी आमची आहे, केंद्र आणि राज्य सरकारने आमचा अंत पाहू नये असा इशारा संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी दिला.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधान प्रास्ताविकाचे वाचन आणि मराठा आरक्षणासाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पासलकर बोलत होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्हा समन्वयक प्राची दुधाने, सारिका कोकाटे, बाळासाहेब अमराळे, भाई कात्रे, कैलास वडघुले, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट यांसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
पासलकर म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून मराठा समाजाने संयम राखत संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. जगाला हेवा वाटावा असे क्रांती मोर्चे देखील संविधानाला धरूनच काढले. त्याचीच फलश्रुती म्हणून मागासवर्ग आयोगाने आरक्षणासाठी सर्व निकषांवर मराठा समाज पात्र असल्याची शिफारस करून मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून देखील मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती देऊन मराठा समाजावर अन्याय केला आहे, अशी भावना संपूर्ण मराठा समाजाची आहे.