“मैदान सोडून पळणे आमच्या रक्तात नाही!” राम मंदिर चोरीप्रकरणी स्वामी गोविंद देव गिरींचा ठाम निर्धार; राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या

स्वामी गोविंद देव गिरी राम मंदिर ट्रस्ट
स्वामी गोविंद देव गिरी राम मंदिर ट्रस्ट

पुणे(प्रतिनिधी)- अयोध्या येथील श्रीराम मंदिर दानपेटीतील कथित अपहाराच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी आपले मौन सोडले असून, आपल्या राजीनाम्याबाबतच्या सर्व बातम्यांचा त्यांनी स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. “मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे आणि संकटाच्या वेळी रणांगण सोडून पळणे हा आमचा स्वभाव नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला आहे. ट्रस्टवर आलेल्या या कठीण काळात खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असून, राजीनामा देण्याचा कोणताही विचार आपल्या मनात नसल्याचे त्यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिर परिसरात झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे ट्रस्टवर टीका होत होती. यावर सविस्तर भाष्य करताना महाराजांनी मान्य केले की, दानपेटीत अपहार झाला असून ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि वेदनादायी आहे. मात्र, या प्रकरणाची तांत्रिक बाजू मांडताना त्यांनी स्पष्ट केले की, दानपेटीतील रक्कम मोजण्याचे काम सामंजस्य कराराद्वारे (MoU) ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) कडे सोपवण्यात आले होते. सध्या या प्रकरणात जे आरोपी अटकेत आहेत, ते सर्व बँकेचे कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची निवड आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने बँकेची होती, असे त्यांनी नमूद केले. तथापि, स्थानिक स्तरावर ट्रस्टच्या वतीने जे पर्यवेक्षण (Supervision) होणे आवश्यक होते, त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्याची कबुली त्यांनी दिली. विश्वस्त चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर ही जबाबदारी होती, पण त्यामध्ये झालेल्या हलगर्जीपणाची आपण सामूहिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे महाराजांनी सांगितले.

अधिक वाचा  राज ठाकरे यांचा घणाघात : "जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात" :

चोरीच्या रकमेबाबत माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. १४ कोटी रुपयांची चोरी झाल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला होता, मात्र महाराजांनी हा आकडा फेटाळून लावला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, ही चोरी सुमारे ३ कोटी रुपयांच्या आसपास असू शकते, परंतु एसआयटीचा (SIT) अंतिम अहवाल आल्यावरच नेमकी आकडेवारी स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ट्रस्टने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. आता मोजणी प्रक्रियेसाठी खिसे नसलेला विशेष ‘ड्रेस कोड’ अनिवार्य करण्यात आला असून, टेबलाऐवजी जमिनीवर बसून पारदर्शक पद्धतीने मोजणी केली जाणार आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रस्ट आणि बँकेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी तैनात करण्यात आले असून, प्रत्येक कर्मचाऱ्याची कडक झडती घेतली जाणार आहे.

अधिक वाचा  PMC Property Tax Abhay Yojana : पुणे महानगरपालिका अभय योजना: शेवटच्या टप्प्यात करदात्यांचा विक्रमी प्रतिसाद, एका दिवसात ४९ कोटींची वसुली : शेवटचे ३ दिवस शिल्लक

या संपूर्ण प्रकरणाचे आध्यात्मिक प्रायश्चित्त म्हणून मंदिराच्या परिसरात ७० पंडितांच्या माध्यमातून १० दिवसांचे विशेष अनुष्ठान आणि विष्णू सहस्त्रनामाचे पाठ सुरू करण्यात आले आहेत. महाराजांनी यावेळी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीवर झालेल्या आरोपांचाही समाचार घेतला.

माझ्या नावावर मालमत्तेची एक वीटही नाही

“माझ्या नावावर मालमत्तेची एक वीटही नाही, माझे केवळ एकच बँक खाते आहे,” असे सांगत त्यांनी झी न्यूजने केलेल्या दाव्यांचे खंडन केले. ते राहत असलेले ‘धर्मश्री’ निवासस्थान हे एक अपार्टमेंट असून त्यातील काही जागा ट्रस्टच्या कार्यालयांसाठी वापरली जाते, असे त्यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष दाखवून दिले.

मंदिराचे व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी ट्रस्ट आता व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारणार असून, लवकरच एका ‘सीईओ’ची (CEO) नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीश आणि तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. राजकीय आरोपांना उत्तर देताना त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ज्यांनी रामाला काल्पनिक ठरवले, त्यांनी आता आम्हाला धर्म शिकवू नये, असे सांगत महाराजांनी चौकशीवर विश्वास व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून, दोषींना कडक शासन व्हावे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अधिक वाचा  #Prakash Ambedkar |आमच्यासाठी अजून इंडिया आघाडीची दारे बंद आहेत : प्रकाश आंबेडकर
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love