अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य : काँग्रेस – भाजप आमने सामने



पुणे(प्रतिनिधि)–केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त आज पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा यांच्या या दौऱ्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काँग्रेस भवन समोर आंदोलन केले.

केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ‘लोकमान्य पुरस्कार’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यादरम्यान, शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांनी आणि पोलीस बंदोबस्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
काँग्रेसने सातारा रोडवरील उत्सव हॉटेल चौकात अमित शहांच्या विरोधात हातात घोषणांचे बॅनर घेऊन निदर्शने केली.  दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि नीट  परीक्षेतील कथित घोटाळा याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. दिल्लीत हजारो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला आहे. अमित शहा यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष(पूर्व विभाग)प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी ( पश्चिम विभाग) यांनी यावेळी केली. आंदोलकांनी “गो बॅक अमित शहा” आणि “हुकूमशाहीचा अंत”,अदानीला पायघड्या विद्यार्थ्यांना बेड्या अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे, आंदोलकांनी हातात घेतलेल्या काठ्यांना खिळे लावलेले बॅनर होते, जे जंतरमंतर येथील पोलिसांच्या कृतीचा निषेध म्हणून दाखवण्यात आले होते.
यावेळी आपले मनोगत व्‍यक्त करताना पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘जतंर – मंतर येथे अंहिसेच्या मार्गाने विद्यार्थी आंदोलन करीत असताना त्यांच्यावर अमानुषपणे लाठीहल्ला, अश्रू गॅस व पॅलेट गनचा वापर करून विद्यार्थ्यांना जखमी केले आणि हे आदेश केंद्रिय गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्या निगरानीखाली झाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाला जाबाबदार असलेले अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. संसदेत सुध्दा या विषयावर अमित शहांनी खुलासा केला नाही तर संसदेतून पळ देखील काढला. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने भरलेले असताना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार देण्यासाठी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ज्या शहराने या देशाला दिशा देणारे नेते घडविले अशा पुण्यनगरीमध्ये अमित शहा यांचा निषेध करणे हे आमचे कर्तव्‍य आहे. या भावनेतून आम्ही केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत.’’
पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘हुकूमशहा अमित शहा पुण्यामध्ये आलेले असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा आम्हाला संविधानाद्वारे मिळालेला
अधिकार आहे. मुलींवर लाठीचार्ज करणे व त्यांचा विनयभंग करणारे प्रकार हे अतिशय निदंनीय आहे. ‘बेटी बचाव – बेटी पढा ओ’ म्हणणारे अमित शहा यांच्या आंदेशाने मात्र महिला व मुलींवर दिल्ली पोलीसांनी हल्ला केला. त्यामुळे अमित शहाने नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा.’’
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी काँग्रेस पक्षाचे पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदू कदम व इतर पदाधिकारी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. शहराला एका अर्थाने छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बॅरिकेडिंग करून एका बाजूला बंदिस्त केले.  त्यामुळे आंदोलकांनी सरकारवर “हिटलरशाही” आणि “दडपशाही” केल्याचा आरोप केला. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वीच पोलिसांनी मध्यरात्री युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय जैन, गौरव बाळंदे आणि सद्दाम शेख यांना ताब्यात घेऊन डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले होते. तसेच अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.  मोठ्या संख्येने पोलीस साध्या वेशात तैनात करण्यात आले होते.
भाजपही आक्रमक

काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी थेट काँग्रेस भवनावर धडक दिली. भाजप कार्यकर्त्यांनी याला “गांधीगिरी” स्टाईल आंदोलन असे नाव दिले.  काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना “सद्बुद्धी” लाभावी यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घालण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी  केला. काँग्रेस पुण्यातील संस्कृती मोडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असून अराजकता पसरवत आहे असा आरोप भाजपच्या आंदोलकांनी केला. भाजपचे कार्यकर्ते कॉंग्रेस भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते  मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनाच्या गेटवरच रोखले आणि विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन व्हॅनमधून बाजूला नेले. भाजप कार्यकर्त्यांनी “अमित शहांचे स्वागत” आणि “प्रशांत जगतापांना सद्बुद्धी दे” अशा घोषणा दिल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे सरकारचे पाप आहे.