पुणे(प्रतिनिधी)-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर देशभरातील तब्बल १३ बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांचा एकाच वेळी उलगडा करण्यात गुजरात पोलिसांना यश आले होते, असे गौरोद्गार देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे काढले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाच्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात एका ऐतिहासिक घटनेचा पहिल्यांदाच सविस्तर खुलासा केला. शाह यांनी सांगितले की, जेव्हा ते गुजरातचे गृहमंत्री होते, त्या काळात गुजरातमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. या भीषण प्रकरणांच्या तपासात मोठे अडथळे येत असताना, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विशेष सूचनेनुसार त्यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली होती. अजित डोवाल यांनी त्यावेळी दिलेल्या अत्यंत अचूक आणि मोलाच्या तपासाच्या टिप्समुळे केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर देशभरातील तब्बल १३ मोठ्या बॉम्बस्फोट प्रकरणांचा एकाच वेळी अचूक उलगडा करण्यात गुजरात पोलिसांना मोठे यश मिळाले होते, असे त्यांनी सांगितले.
अजित डोवाल यांच्या प्रेरणादायी कारकीर्दीवर प्रकाश टाकत अमित शाह यांनी त्यांचा ‘जन्मजात देशभक्त’ असा उल्लेख केला. शहा म्हणाले, १९६८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले अजित डोवाल यांनी आपल्या सेवेच्या सुरुवातीलाच केरळ केडर सोडून गुप्तचर विभागात दाखल होण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत ईशान्य भारत, सिक्कीम, पंजाब आणि काश्मीर यांसारख्या अत्यंत संवेदनशील व आव्हानात्मक भागांमध्ये देशसेवा बजावली आहे. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानमध्ये सलग सहा वर्षे अत्यंत गुप्तपणे वास्तव्य करून त्यांनी भारतासाठी जी महत्त्वाची माहिती गोळा केली, ती देशाच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक ठरली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत कणा मानल्या जाणाऱ्या ‘मल्टी एजन्सी सेंटर’ या संस्थेची स्थापना डोवाल यांनीच केली होती, जी आजदेखील देशाच्या गुप्तचर यंत्रणेत कळीची भूमिका बजावत आहे असे शाह यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वात पहिली महत्त्वाची नियुक्ती अजित डोवाल यांची ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ म्हणून केली असे सांगून शाह म्हणाले, मोदींच्या कार्यकाळात भारताचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण हे अत्यंत कणखर बनले आहे आणि यामध्ये अजित डोवाल यांच्या धोरणात्मक निर्णयांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. डोवाल हे भारताचे आजवरचे सर्वाधिक काळ सेवा बजावणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ठरले असून, भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करणे, लष्करामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि कठीण प्रसंगात कठोर निर्णय घेणे यामध्ये त्यांचा अनुभव नेहमीच मोलाचा ठरला आहे असे त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळक पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून तो समाजासाठी झटणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्याची आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळवून देण्याची एक उत्तम पद्धत आहे. अजित डोवाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भारतमातेच्या रक्षणासाठी समर्पित केले आहे, आणि अशा महान व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करताना आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे उद्गारही शाह यांनी काढले.
लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांचा गौरव
प्रारंभी अमित शाह यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. अण्णा भाऊ साठे यांनी केवळ दीड दिवस शाळेत जाऊनही स्वतःला ज्या प्रकारे शिक्षित केले आणि संपूर्ण समाजासाठी एक महान समाजसुधारक, लोककवी व ‘साहित्य रत्न’ म्हणून आपले जीवन व्यतीत केले, याचा गौरवपूर्ण उल्लेख शाह यांनी केला. तसेच, लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या ऐतिहासिक घोषणेचे महत्त्व विशद करताना त्यांनी स्पष्ट केले की, टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला सांस्कृतिक राष्ट्रवादाची मजबूत जोड दिली. त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव आजही संपूर्ण देशाला योग्य ती दिशा दाखवत आहेत. टिळक हे केवळ एक शिक्षक किंवा पत्रकार नव्हते, तर ते एक उच्चकोट्याचे चिंतक आणि कर्मयोगी होते, ज्यांनी कोट्यवधी देशवासीयांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली असे शाह म्हणाले.
















