महाविद्यालयीन जीवनात आत्मशोध घेण्याची संधी-गायिका आरती अंकलीकर-टिकेकर

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे- मी कोण आहे? मला काय आवडते? मला काय व्हायचे आहे? ते करण्या योग्य टॅलेंट माझ्यात आहे का? हा आत्मशोध घेण्याची संधी महाविद्यालयीन जीवनात मिळत असते. विविध स्पर्धांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी ती शोधली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.

डीईएसच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह विभागा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अस्तित्व’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन करताना अंकलीकर बोलत होत्या.

डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद रावत, प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, माजी प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, प्रा. वृषाली महाजन, प्रा. निकिता शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंकलीकर पुढे म्हणाल्या, ‘‘कोणतीही गोष्ट उत्तम करण्यासाठी किमान बारा वर्षांची तपश्चर्या करावी लागते. त्यानंतर कोणी शिक्षक, कोणी गायक तर कोणी कानसेन होतो. आपल्या गुरुचा सल्ला घेऊन योग्य दिशेने सातत्यपूर्ण मेहनत केल्यास यश निश्चित मिळते.’’

कुंटे म्हणाले, ‘‘आपल्या राष्ट्राची ओळख इतिहास, कला आणि संस्कृती यामुळे आहे. कला आणि संस्कृतिचा आयाम हा वैयक्तिक नसून, आपल्या देशाचा राष्ट्रीय आविष्कार आहे. त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे महत्त्व आहे.’’

भारतीय संस्कृतिच्या संवर्धनासाठी ‘अस्तित्व’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे तेरावे वर्ष आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित नृत्य, संगीत, वादन, चित्रकला, छायाचित्रण, स्केचिंग, मेहेंदी, कोडी सोडवा अशा पंधरा प्रकारांमध्ये या वर्षी स्पर्धा झाल्या. त्यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *