पुणे(प्रतिनिधी)– आम्हाला डिजिटल बोर्ड नसले तरी चालतील. पाटी, पेन्सिल, वही एवढे पुरेसे आहे. फक्त शिक्षकांना अशैक्षणिक कामे, जबाबदाऱ्या सोपवू नयेत, असे आवाहन आदर्श शिक्षिका सीमाताई शिंदे यांनी येथे केले. शिक्षकांना फक्त मनापासून शिकवण्याचे काम करता यावे. विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्या फुलविण्याचे समाधान शिक्षकांना मिळावे, असेही त्या म्हणाल्या.
निमित्त होते, हिंदू महिला सभेच्या वतीने साहसदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या साहस, सजग आणि तेजस्विनी पुरस्कार प्रदान समारंभाचे.याप्रसंगी युवा गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिला मिलिंद नातू स्मृती प्रित्यर्थ साहस पुरस्कार, आदर्श शिक्षिका सीमाताई शिंदे यांना लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ सजग पुरस्कार सजग पुरस्कार तर नासापर्यंत झेपावलेल्या अदिती पारठे हिला तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे साहस पुरस्काराचे स्वरूप आहे. अन्य दोन पुरस्कार धनादेश, मानपत्र, स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचे आहेत.
गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले यावेळी उपस्थित होत्या. सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. २०२६ ची एव्हरेस्ट मोहीम पूर्ण करणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेच्या निकुंज शहा, विवेक शिवदे, अखिल काटकर या गिर्यारोहकांचा यावेळी दामले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शुभांगी दामले यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांशी संवाद साधला.
शिंदे म्हणाल्या, कोविड काळात मोबाईलचा वापर सकारात्मक पद्धतीने करण्यातून मी शैक्षणिक उपक्रमांचे व्हिडिओ सुरू केले. जे शिकवते, तेच चित्रित करून समाजमाध्यमांवर शेअर केले. त्यांना देशविदेशांतून प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून उत्तमोत्तम विद्यार्थी घडावेत आणि देशाचे आदर्श नागरीक निर्माण व्हावेत, हाच उद्देश आहे.
गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे म्हणाले, अनुकूलता असो वा नसो, साधने मिळोत अथवा न मिळोत, पण साहसी वृत्ती बाणवली, तर अपेक्षित गोष्टी प्राप्त करता येतात. प्रत्येकाने आपापल्या स्वप्नांचे, आशा – आकांक्षांचे एव्हरेस्ट गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. मी ४५ वर्षे गिर्यारोहण क्षेत्रात आहे. साहसी वृत्ती हा या क्षेत्राचा गाभा आहे. साहसामुळे आपल्याला आपल्या क्षमता समजतात. त्यातून ओळख निर्माण होते आणि कृतीशील होण्याची प्रेरणा मिळते. पहिली भारतीय महिला एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल अशाच साहसी वृत्तीतून घडली. एव्हरेस्ट शिखर तर गाठावेच, पण प्रत्येकाच्या मनातल्या स्वप्नांचे, आशांचेही गौरीशंकरही सर करावे.
अदितीने नासापर्यंत नेणार्या निवडप्रक्रियेची माहिती दिली. दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रेरणा देणारे शिक्षक, पाठिंबा देणारे नातेवाईक या प्रवासात सर्वात महत्त्वाचे ठरले. गणित आणि विज्ञान, या विषयांवर भर देत तयारी केली. खूप प्रश्नपत्रिका सोडवल्या. यानिमित्ताने संगणक, रेल्वे आणि विमानप्रवास प्रथमच केला. नासा येथे १० दिवस होतो. खूप नव्या गोष्टी शिकता आल्या. सुरवातीला भीती, दडपण जाणवले होते, पण सोबत आमचे शिक्षक होते आणि आमची पूर्वतयारी चांगली करून घेतल्याने अडचण आली नाही, असे ती म्हणाली.
ग्रिहिथाने गिर्यारोहण, प्रवासाची सुरवातीपासून आवड असल्याचा उल्लेख केला. चालणे, चढणे आणि प्रवास करणे, या आवडीच्या गोष्टी आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी मी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला, तो आव्हानात्मक वाटला. मी प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्रेक करत होते. बर्फात, कमालीच्या थंडीत ट्रेक करत होते. पण सगळे व्यवस्थित पार पडले. त्यानंतर इतरही देशांतले ट्रेक मी पूर्ण केले, असे ती म्हणाली.
यशश्री आठवले यांनी मानपत्र वाचन केले. तृप्ती कैसरे यांनी गिर्यारोहकांच्या मानपत्रांचे वाचन केले. शिक्षक राजू किंडरे, ग्रिहिथाचे वडील सचिन विचारे, डॉ. सविता केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया दामले यांनी आभार मानले.















