पुणे(प्रतिनिधी)-आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे; पण स्वातंत्र्य म्हणजे एवढेच नव्हे, असे वक्तव्य भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आजच्या तरुण पिढीला उद्देशून शनिवारी केले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाच्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा‘ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना देताना डोवाल यांनी ही वक्तव्य केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलपती डॉ. दिपाली टिळक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डोवाल म्हणाले, “आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रेरक, अद्भुत सेनानी, विचारवंत आणि मार्गदर्शक लोकमान्य टिळक यांची ही पुण्यतिथी आहे. आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे; पण स्वातंत्र्य म्हणजे एवढेच नव्हते. ज्या काळी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य कोणामध्येही नव्हते, समाजात वेदना आणि अत्याचार होते, त्या काळी लोकमान्य टिळकांनी संघर्षाचा कठीण मार्ग स्वीकारत देशाचे नेतृत्व केले.”
भारतला शक्तिशाली आणि विकसित बनवणे हे आता आपले जन्मसिद्ध कर्तव्य‘
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच,” ही लोकमान्य टिळकांची गर्जना आजही तितकीच प्रासंगिक आहे. मात्र, आजच्या बदलत्या काळात प्रत्येक भारतीयाने, विशेषतः तरुणांनी, ‘भारतला एक शक्तिशाली आणि विकसित राष्ट्र बनवणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य आहे आणि मी ते पूर्ण करणारच,’ असा नवा मंत्र आत्मसात करण्याची गरज आहे, असे आवाहनही अजित डोवाल यांनी यावेळी केले.
अजित डोवाल म्हणाले, टिळक हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हते, तर ते शौर्य, समाजसुधारणा आणि वैचारिकतेचा एक अद्भुत ‘त्रिवेणी संगम’ होते. ज्या काळात इंग्रजांविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत नव्हती, त्या काळात टिळकांनी सरकारला थेट आव्हान दिले. त्यांच्यातील समाजसुधारकाचे दर्शन प्लेगच्या महामारीत घडले, जेव्हा त्यांनी स्वतःचा २१ वर्षांचा मुलगा विश्वनाथ याला गमावूनही पुणे सोडले नाही आणि जनतेची सेवा केली. याशिवाय, ‘गीतारहस्य’ सारख्या ग्रंथातून त्यांनी मांडलेला कर्मयोगाचा विचार आजही मानवी जीवनाला नवी दिशा देणारा आहे.
आपल्या भाषणात डोवाल यांनी ७६ वर्षांपूर्वीच्या पुणे भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वडील लष्करी सेवेत असताना डोवाल यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले होते. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेतील एका शिक्षकांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर दिलेल्या व्याख्यानातूनच त्यांची टिळकांशी पहिली ओळख झाली होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ७६ वर्षांनंतर त्याच पुण्याच्या भूमीवर टिळकांच्या नावाने मिळणारा पुरस्कार स्वीकारणे हे आपले मोठे भाग्य असल्याचे त्यांनी भावूक होऊन नमूद केले.
देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना डोवाल यांनी ‘व्हीईडी’ (VED – Vital, Essential, Desirable) विश्लेषणाचा आधार घेतला. जीवनात अनेक इच्छा आणि गरजा असतात, परंतु जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो, तेव्हा राष्ट्रसेवा ही ‘व्हायटल’ म्हणजेच सर्वात महत्त्वाची श्रेणी असली पाहिजे, असे ते म्हणाले. वैयक्तिक स्वार्थ, जात किंवा पंथ यापेक्षा राष्ट्रहित नेहमीच सर्वोपरी असायला हवे. भारताच्या विकासाने जगातील सर्वच देश आनंदी आहेत असे नाही; भारताचा प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य आव्हाने उभी केली जात आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
डोवाल यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘आग की भीख’ या कवितेचा संदर्भ देत तरुणांना आवाहन केले. ज्याप्रमाणे कवीने देशाच्या हितासाठी ईश्वराकडे ‘अंगार’ मागितला, त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जिद्द बाळगायला हवी. सध्या भारतासमोर विकासाची आणि सामर्थ्यशाली होण्याची एक मोठी संधी आहे आणि ती आपण गमावता कामा नये, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश योग्य दिशेने वाटचाल करत असून, प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
















