पुणे -‘आमचं कालही म्हणणं होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. आंबील ओढा अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला कोणी? प्रशासनावर दबाव कोणी आणला? हा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी माननीय सुप्रियाताईंची ही केविलवाणी धडपड आहे. संबंधित विकासक कोणाच्या जवळचा आहे, हे सर्व पुणेकर जाणतात असा प्रतिटोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. हल्ली लोकसभा निवडणुका नसल्याने मा. सुप्रियाताई पुण्यात जास्त नसतात, त्यामुळे त्यांना पुण्यात काय चाललंय याची जास्त माहिती नसावी असा चिमटाही त्यांनी काढला.
पुण्यातील आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने कारवाई केली. त्यावरून पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक आमने- सामने आले होते. या कारवाईवरून प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यानंतर महापालिका न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली होती. पुणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर ताशेरे ओढले. पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी सुळे यांनी केली आहे. त्यावर महापौर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया व्याक केली.
महापौरांनी झेपत नसेल राजीनामा द्यावा या सुळे यांच्या मागणीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, पुणेकरांना माहिती आहे कोरोनाच्या एवढ्या मोठ्या संकटात आम्ही किती सक्षमपणे लढलो, पुण्याला संकटातून बाहेर काढलं. आमच्या लढ्याचं कौतुक त्यांचेच बंधू असलेले पालकमंत्री माननीय अजितदादांनीही केलं आहे. कदाचित अजितदादांच्या मताशी सुप्रियाताई सहमत नसतील असे मोहोळ यांनी म्हटलं आहे.