पुणे मनपात राडा : आक्रमक शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला

राजकारण
Spread the love

पुणे — पुणे महानगरपालिकेत आलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांना निवेदन देण्यासाठी थांबलेल्या शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. सोमय्या हे या झटापटीत पायऱ्यांवर कोसळले. यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले. दरम्यान, किरीट सोमैया यांनी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या हल्ल्यासंदर्भात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जशास तसं उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नते किरीट सोमय्या पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये पत्रकार परिषद घेणार होते. त्यासाठी ते महापालिकेत आले असताना भाजप सत्तेत असलेल्या पुणे महापालिकेमधील भ्रष्टाचाराबाबत निवेदन देण्यासाठी शिवसैनिक त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते.  शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्या यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

या झटापटीत किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. याच दरम्यान त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसैनिकांवर निशाणा साधला आहे. ‘पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला.” असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे.

पायाखालची वाळू घसरल्याने सभ्यतेचा बुरखा फाटला -चंद्रकांत पाटील

दरम्यान,  “मुद्दे संपले की माणसं गुद्यावर येतात. पायाखालची वाळू घसरली की सभ्यतेचा बुरखा फाटून मूळ चेहरा समोर येतो. किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधले नाहीत. त्यांचा प्रकरणे काढण्याचा इतिहास आहे. अनेकांना त्यांनी घरी पाठवलं आहे.” अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *