पुणे— शोध मराठी मनाचा २०२३ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह संत तुकाराम नगर येथे भरणार आहे.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.३० (साडेचार) वाजता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार २०२३ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरीटेबल ट्रस्ट, वसई- जागतिक मराठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाई जयंत पाटील, हितेन्द्र ठाकूर, नागराज मंजुळे, अरुण फिरोदिया, हणमंतराव गायकवाड उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले करणार आहेत. अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिन ईटकर, सुनील महाजन आणि प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
या संमेलनानिमित्त अमेरिकेत खासदार झालेले पहिले मराठी व्यक्ती असलेले श्रीनिवास ठाणेदार यांना देखील जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र, हा पुरस्कार त्यांना या संमेलनानंतर म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रदान करण्यात येणार आहे. या संमेलनाचा समारोप दिनांक 8 जानेवारी होणार असून या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.डी पाटील आहेत. चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, कृषी, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांचा सहभाग या संमेलनात आहे.
संमेलनाची कार्यक्रम पत्रिका
यानिमित्त संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवार दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० (पाच) वाजता रंगतरंग हा संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मराठी हिंदी गीते, संगीत, नृत्य आणि हास्याचा धमाका असलेला हा कार्यक्रम चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि श्रेया बुगडे सादर करणार आहेत. यामध्ये पार्श्वगायक हृषिकेश रानडे, योगिता गोडबोले, मनिषा निश्चल आणि नृत्यांगना चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि लावणी सम्राज्ञी वैशाली जाधव यांच्या नृत्य-गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
या संमेलनात शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २.०० (दोन) वाजता समुद्रापलीकडे- भाग १ हा परदेशस्थ मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हैद्राबाद, तेलंगणाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये मनोज शिंदे (अमेरिका), कौशल शहा (लंडन), भरत गीते (जर्मनी), राजेश बाहेती (दुबई), रोहिदास आरोटे (दक्षिण कोरिया), वृंदा ठाकूर (नेदरलँड) आदी मान्यवर सहभागी होणार असून त्यांच्याशी सचिन ईटकर संवाद साधणार आहेत.
यानंतर दुपारी ३.३० (साडेतीन) वाजता प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांची मुलाखत होणार असून त्यांच्या प्रा. मिलिंद जोशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
यानंतर सायं. ६.३० (साडेसहा) वाजता कलावंतांच्या सामाजिक जाणिवा या कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेते सयाजी शिंदे सहभागी होणार आहेत.
शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० (दहा) वाजता होणाऱ्या आकाशाशी जडले नाते….या कार्यक्रमाला नवी दिल्ली येथील अखिल भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष मा. विनय सहस्त्रबुद्धे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात आमोद केळकर (अमेरिका) आणि नीलम इंगळे सहभागी होणार असून त्यांच्याशी मंदार भारदे संवाद साधणार आहेत. सकाळी ११.०० (अकरा) वाजता प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सुबोध भावे यांच्याशी माझा चित्रप्रवास हा संवादात्मक कार्यक्रम होणार असून त्यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधणार आहेत.
दुपारी १२.०० (बारा) वाजता, समुद्रापलीकडे भाग – २ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये असंत गोविंद (मॉरिशस), हेमा राचमाले (अमेरिका), विद्या जोशी (अमेरिका), रेश्मा सांभारे (अमेरिका), डॉ. राहुल तुळपुळे (दुबई), कौस्तुभ देशपांडे (अमेरिका), दयानंद देशपांडे (न्युझीलंड), मिहीर शिंदे (ऑस्ट्रेलीया) सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी महेश केळुसकर आणि डॉ. शैलेश गुजर संवाद साधणार आहेत.
दुपारी ३.०० (तीन) वाजता जागतिक आरोग्यव्यवस्था आणि भारत या विषयावरील कार्यक्रमात पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. रवी गोडसे (अमेरिका), डॉ. मकरंद जावडेकर (अमेरिका) सहभागी होणार असून त्यांच्याशी डॉ. शंतनु अभ्यंकर संवाद साधणार आहेत.
दुपारी ४.३० (साडेचार) वाजता, बीज अंकुरले या कार्यक्रमात डॉ. सी. डी. माई, शेखर गायकवाड, किशोर गोरे (अमेरिका), अमित केवल (फ्रान्स), विलास शिंदे आणि सुधीर भोंगळे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी सुनिल चव्हाण आणि विजय चोरमारे संवाद साधणार आहेत.
संध्याकाळी ६.३० (साडेसहा) वाजता चित्र- शिल्प- काव्य या कार्यक्रमात अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, अंजली कुलकर्णी, महेश केळुस्कर, वैभव जोशी, मीनाक्षी पाटील, सिसिलिया कार्व्हालो, कल्पना दुधाळ, भरत दौंडकर, साहेबराव ठाणगे, सुनिती लिमये, प्राजक्ता पटवर्धन, वैशाली पतंगे, शोभा रोकडे, नीतीन देशमुख, नारायण पुरी, लता ऐवळे, मृणालिनी कानिटकर, अनुजा जोशी, प्रशांत मोरे, प्रकाश होळकर, रमजान मुल्ला सहभागी होणार आहेत. तसेच यामध्ये हर्षदा कोळपकर (रचना चित्र), प्रा. सुरभी गुळवेलकर (व्यक्तिचित्र), सुप्रिया शिंदे (शिल्पकार) हे कलावंत सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश केळुसकर आणि श्रीकांत कदम करणार आहेत.
रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० (दहा) वाजता होणाऱ्या सरस्वतीच्या मंदिरात या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ पाटील, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि माधवी आमडेकर (लंडन) सहभागी होणार असून त्यांच्याशी नंदिता दाते संवाद साधणार आहेत.
सकाळी ११.०० (अकरा) वाजता व्यंग, वास्तव आणि राजकारण या विषयावरील परिसंवादात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्याशी प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी २.३० (अडीच) वाजता अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी देऊळबंद ते हंबीरराव एक प्रवास या विषयावर संवाद कार्यक्रम होणार असून त्यांच्याशी विनोद सातव संवाद साधणार आहेत. यानंतर दुपारी ३.३० (साडेतीन) वाजात माझ्या गोव्याच्या भूमीत या विषयावरील परिसंवादात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी महेश केळुसकर संवाद साधणार आहेत.