कोल्हापूर(प्रतिनिधी)–कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत आयोजित ‘संघर्ष मोर्चा’च्या विराट जनसभेतून काँग्रेसचे आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी महायुती सरकारविरुद्ध थेट युद्ध पुकारले आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि जयंत पाटील, राजू शेट्टी यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे सोमवारी पार पडलेल्या सभेत, “अब रण ऐसा होगा, फीर कभी नही जैसा होगा” असा सज्जड इशारा सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूरचा सहकार लढा हा आता केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा लढा बनला आहे. 2029 च्या राज्यातील सत्तापरिवर्तनाची बीजे याच कोल्हापूरच्या भूमीतून रोवली गेल्याचा दावा त्यांनी केला.
सहकाराचा कायदा पायदळी तुडवल्याचा थेट आरोप
राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने शपथ घेताना कुणाबद्दलही सूडबुद्धीने न वागण्याचे वचन दिले होते; मात्र गोकुळ दूध संघाच्या बाबतीत सरकार अत्यंत सूडबुद्धीने वागत असल्याचा घणाघाती आरोप सतेज पाटील यांनी केला. गोकुळवर प्रशासक आणण्यासाठी सरकारने विशेष कायदा केला, तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका टाळण्यासाठी तोच कायदा रद्द करून जुन्या संचालक मंडळाला मुदतवाढ दिली. या दुटप्पी धोरणाविरोधात स्वतःला सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन प्रशासक रद्द करावा लागला आणि निवडणुका घडवून आणाव्या लागल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे नेते मात्र या अन्यायाविरुद्ध मूग गिळून बसले होते आणि केवळ ‘अदृश्य शक्ती’चे नाव सांगत होते, अशी खरपूस टीका त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली.
५.५ लाख शेतकऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी दिलेला लढा
तीन-तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदारांची फौज एका बाजूला असताना, आपण केवळ सामान्य कार्यकर्ते आणि राजू शेट्टी, गणपतराव पाटील, सत्यजित पाटील यांच्या साथीने स्वाभिमानाची ही निवडणूक लढवली. सलग २४ दिवस पायाला भिंगरी लावून, २२ दिवस अँटीबायोटिक औषधांवर राहून आणि प्रत्येक तालुक्यातील घराघरांत जाऊन ५.५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रचार केला. या निवडणुकीत आपल्या स्वतःच्या मुलाला नव्हे, तर बयाजी शेळके आणि बाबासाहेब देवकर यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन २५ कार्यकर्त्यांचे पॅनल मैदानात उतरवले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे हा कोणताही जातिवाद नसून, मातंग समाजाचे सुजित मिंचेकर किंवा मराठा समाजाचे युवराज बापू पडले तेव्हा गप्प बसणाऱ्या मुश्रीफ यांनी आपल्यावर जातिवादाचा आरोप करू नये, असा सवाल त्यांनी केला.
स्वीकृत संचालकांची बेकायदेशीर नियुक्ती आणि सांगलीच्या नेत्याची वर्णी
हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या षडयंत्रामुळेच गोकुळमध्ये चार स्वीकृत संचालकांची मागील दाराने नियुक्ती करण्यात आल्याचा घणाघात पाटील यांनी केला. या नियुक्त्यांचा शासन निर्णय (जीआर) तात्काळ संकेतस्थळावर अपलोड न करता गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. पन्हाळ्याचे माजी बँक निरीक्षक शिवाजी दिनकर अडनाईक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे, कागलचे कृष्णा ज्ञानदेव पाटील आणि थेट सांगलीचे ॲड. प्रशांत पाटोळे या चौघांची नावे वाचून दाखवत, ज्यांच्या घरी एकही गाय किंवा म्हैस नाही अशा लोकांना तज्ज्ञ संचालक बनवले गेल्याची टोलेबाजी त्यांनी केली. कोल्हापुरातील महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते जसे की नाताजी पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, अशोक परागटे यांना डावलून थेट सांगलीतील माणसाला गोकुळवर आणून कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला गेला, असा थेट आरोप त्यांनी उपस्थित केला.
‘गोकुळ’ला अमूलच्या दावणीला बांधण्याचे राष्ट्रीय षडयंत्र
सांगलीच्या तज्ज्ञ संचालकाची नियुक्ती ही गोकुळ दूध संघाला ‘अमूल’ (सरदार पटेल मिल्क फेडरेशन) च्या दावणीला बांधण्याच्या मोठ्या षडयंत्राची सुरुवात आहे, असा गंभीर इशारा सतेज पाटील यांनी दिला. देशातील ६५ कोटी लिटर दूध संकलन १०० कोटी लिटरवर नेण्यासाठी लहान लहान दूध संघ अमूल आणि मदर डेअरीच्या खाली आणले जात आहेत. देवगिरी महानंदा दूध संघ आधीच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (NDDB) सोपवण्यात आला असून, आता गोकुळची स्वायत्तता संपवण्याचा घाट घातला जात आहे. स्वर्गीय रत्नाप्पा कुंभार, सा. रे. पाटील, हिंदुराव पाटील, सदाशिवराव मंडलिक, तात्यासाहेब कोरे, विक्रमसिंह राजे, शामराव भिवाजी असूद, डी. सी. नरके, पी. एन. पाटील आणि आनंदराव पाटील चुळेकर यांनी कष्टाने उभा केलेला कोल्हापूरचा सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असे ते म्हणाले.
कायदेशीर लढाई आणि अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत आवाहन
अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमात कोरमची कोणतीही कायदेशीर आवश्यकता नसताना, बेकायदेशीरपणे नियुक्त केलेल्या चार स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. आपण स्वतः अहंकार बाजूला ठेवून विरोधकांच्या नेत्यांशी चर्चा केली होती आणि बहुमत आपल्याकडे (१३ संचालक) असतानाही सहकाराच्या हितासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दर्शवली होती. न्यायालयाने या बेकायदेशीर कायद्याला स्थगिती द्यावी ही अपेक्षा व्यक्त करतानाच, उर्वरित १२ निर्वाचित संचालकांनी अध्यक्षांच्या बैठकीस उपस्थित राहून गोकुळवर कोल्हापूरच्या मालकीचाच अध्यक्ष कसा होईल यासाठी एकत्र यावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.














