पुणे(प्रतिनिधी)-कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या ठरल्याप्रमाणेच पार पडणार असून, उद्याच या निवडणुकीचा निकाल आणि नवीन अध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे. उच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले असून, निवडून आलेले २५ सदस्य आणि राज्य शासनाने नियुक्त केलेले ४ सदस्य असे एकूण २९ संचालक उद्या होणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करणार आहेत. मात्र, उद्या अध्यक्ष निवडला जाणार असला तरीही ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि तिचा अंतिम निकाल हा उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन राहणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, या संपूर्ण मतदानाच्या आणि मोजणीच्या प्रक्रियेची विशेष व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. मतदानादरम्यान २५ निवडून आलेल्या सदस्यांची मते वेगळी ठेवली जातील आणि राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ४ सदस्यांची मते स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवली जाणार आहेत. मतमोजणी करताना २५ सदस्यांची व ४ नियुक्त सदस्यांची मोजणी एकत्रित केली जाणार असली, तरी ४ सदस्यांचे मत वेगळ्या पद्धतीने नोंदवून ठेवूनच निवडणुकीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या न्यायालयीन संघर्षाची पार्श्वभूमी पाहता, सतेज पाटील यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सहकारी कायद्यानुसार राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ४ सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी ठाम बाजू सतीश पाटलांच्या वकिलांनी मांडली होती. याउलट, राज्य सरकारने आपली प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सांगत सतेज पाटलांची याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. कोर्टाने राज्य सरकारची ही विनंती अमान्य केली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे सध्याच्या टप्प्यावर सतेज पाटील किंवा राज्य सरकार या दोघांनाही न्यायालयाकडून पूर्ण दिलासा मिळालेला नाही.
उद्या गोकुळचा नवीन अध्यक्ष निवडला जाणार असला, तरी या संपूर्ण प्रक्रियेवर २५ नोव्हेंबरच्या कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम राहणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत जर न्यायालयाने राज्य शासनाच्या ४ सदस्यांच्या मतदानाबाबत किंवा अध्यादेशाबाबत नकारात्मक निर्णय दिला, तर उद्या पार पडणारी गोकुळ अध्यक्षपदाची ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्णतः रद्द ठरू शकते. अशा परिस्थितीत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी तसेच संचालक मंडळासाठी नव्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे उद्या नवीन अध्यक्ष घोषित झाला, तरी गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाचा कायदेशीर वाद २५ नोव्हेंबरपर्यंत कोर्टातच अडकून राहणार आहे.













