पुणे— पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची देखील किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासात गजाआड केले आहे.
मंथन किरण भोसले (वय २० रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण समदर (वय २१ घरकुल चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंथन भोसले हा आदित्य राहत होता त्याच सोसायटीमध्ये राहत होता. तो सतत सोसायटी मध्यल्या नागरिकांना व त्यांच्या मुलांना विनाकारण त्रास देत होता. यावरून आदित्यचे वडील गजानन ओगले यांनी त्याला बऱ्याचवेळा जाब विचारला होता.त्यामुळे मंथन व ओगले कुटुंबात यामुळे वाद झाले होते व याची चर्चा सोसायटीत झाली होता. याचाच राग मनात धरून त्याने अगदी शिताफीने त्याचा साथीदार अनिकेत याच्या सोबत संगनमत करून गुरुवारी (दि.८) संध्याकाळी बिल्डींगखाली खेळायला आलेल्या आदित्यला अपहरणासाठी मंथन याने त्याच्या कारमध्ये ओढले. यावेळी आदित्य याने आरडो-ओरड सुरु केली. त्याचा आवाज बंद कऱण्यासाठी आरोपीने त्याचे तोंड व नाक दाबले यातच आदित्य याचा मृत्यू झाला.
दरम्यान गजानन यांनी आपला मुलगा सापडत नसल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही निर्जन जागांचा तातडीने शोध सुरु केला. यावेळी गजानन यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून २० कोटी रुपयांची मागणी करणारा एसएमएस आला. पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे माहिती काढली तर तो फोन क्रमांक उत्तरप्रदेश येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार तपास सुरु असताना आरोपीने चिखली येथील एका बिगारी काम करणाऱ्या कामगाराच्या फोनचा वापर केल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांच्या सायबर टिमने अथक प्रयत्नानंतर मंथन याच्यापर्यंतचा पुराव्याचा धागा शोधून काढला. मंथन हा आदित्यच्या सोसायटीत राहत असून त्याबाबत सोसायटी धरकांनी अनेक तक्रारी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मंथनला ताब्यात घेऊन त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आदित्यचा मृत्यू झाला असून त्याला पोत्यात भरून एमआयडीसी भोसरी परिसरातील एका पडीक बिल्डींगच्या टेरेसवर नेवून टाकल्याचे सांगितले पोलिसांनी त्यानुसार शुक्रवारी (दि.९) रात्री आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला.
मंथनच्या वडिलांनी पोलिसांना माहिती देताना मंथन व ओगले कुटुंबीयांचे काही महिन्यांपूर्वी जोरदार भांडण झाले होते. तो सोसायटीत सर्वांना थोडा त्रास देत होता यासाठी त्याला सहा महिन्यांसाठी मामाच्या गावाला सोडल्याचेही त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर प्रकरण मिटले असे सर्वांना वाटले होते. याचाच आधार घेऊन पोलिसांनी मंथनला चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याची उत्तरे काही विसंगत वाटत असल्याने पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. ओगले यांच्यावरील राग तसेच २० कोटी मागितले, तर किमान तीन ते चार लाख तरी मिळतील म्हणून हा कट रचल्याचे त्याने कबुल केले. मात्र, या घटनेने केवळ ओगले कुटुंब नाही तर मंथनचे भोसले कुटुंब व पूर्ण सोसायटी हादरली आहे.
झटापटीत गळा दाबला
आदित्यच्या अपहरणाचा मागील पंधरा दिवसापासून कट रचला गेला. यासाठी मंथनने वडिलांची कार घेतली तिच्या काचांना काळ्या फिती लावल्या. सोसायटीच्या सीसीटीव्ही कक्षेत येणार नाही असा पार्किंगचा कोपरा मंथंनने हेरून ठेवला. आदित्य याची आत्य़ा त्या बिल्डींगमध्ये रहाते व तिचा आदित्यवर विशेष लळा होता हे मंथनला माहिती होते. याचाच फायदा घेऊन गुरुवारी मंथन खाली खेळायला येताच अनिकेत याने आदित्यला “आत्याने बोलावले आहे म्हणून सोबत गाडी जवळ नेले. गाडीत बळजबरी बसवताना आदित्यने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी मंथन याने रागाने आदित्यचे तोंड दाबले व एका हाताने त्याचा गळाही दाबला गेला. यात आदित्यचा मृत्यू झाला.
दोघे आरोपी नशेच्या आहारी
मंथन व त्याचा मित्र यांना गांजा, सिगारेट याचेही व्यसन असल्याचे समोर आले. यासाठी तो व त्याचे मित्र एमआयडीसी भोसरी येथे बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात व्यसन करण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांना बंद पडलेल्या कंपन्यांची माहिती होती. अशाच एका कंपनीच्या बिल्डींगच्या छतावर आदित्यचा मृतदेह गोणीत भरून फेकून देण्यात आला.
पोलिसांना चकवा देण्यासाठी खंडणीची मागणी
पोलीस सोसायटीमध्ये चौकशीसाठी आले. तोपर्यंत मंथनने मृतदेहाची विल्हेवाट लावून बिल्डींगमध्ये परत आला होता. यावेळी पोलिस चौकशी करत असताना तो त्यांच्या आसपास फिरकत सहकार्य करण्याचे नाटक करत होता. दरम्यान पोलिसांची उशिरापर्यंत तपासणी सुरु असताना तो तेथून चिखली येथे एका मोबाईलच्या दुकानात गेला. तिथे एक कामगार त्याचा मोबाईल घेऊन आला होता. यावेळी त्याने त्या कामगाराला माझा माबाईल हँग झाला आहे. मला एक फोन करायचे आहे असे सांगून मोबाईल घेतला. त्या कामगाराच्या फोनवरून त्याने आदित्यच्या वडिलांना रात्री एक वाजता 20 कोटींची खंडणी मागितली. या एसएमएसने पोलिसांची तपासाची दिशाच फिरली.
निष्काळजीपणा भोवला; सीसीटिव्ही बंद
पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमध्ये केवळ दोनच सीसीटिव्ही कॅमेरे सुरू आहेत. इतर इमारतींना सीसीटिव्हीची सुरक्षाच नसल्याचे तपासात समोर आले आहे. महिन्याभरापूर्वी या इमारतीमध्ये चोरीचा प्रकार झाला होता.यानंतर येथील रहिवासांनी याबाबत तक्रारी केल्या. त्यावेळी देखील सुरक्षेचा मुद्दा चर्चेला गेला मात्र त्यानंतरही सीसीटीव्ही बंदच होते.याचाच फायदा आरोपींनी घेतला. गाडी सीसीटीव्ही कक्षेच्या बाहेर राहील याची पुरेपूर काळजी आरोपींनी घेतली होती.