पुणे- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली. मात्र, त्यांच्या निधनाच्या समाज माध्यमांवर वृत्तामुळे आणि त्यांच्या बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळेही मोठा संभ्रम निर्माण झाला. असे असताना विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. गोखले यांच्या निधनाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचे सांगितले जात आहे. एनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशीरा त्यांची तब्येत खालवली असल्याचं वृत्तही आलं. काही बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटवरून प्रसारमाध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचं वृत्त दिलं आणि उलटसुलट चर्चा सुरू झाली.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर असून अद्याप त्यांचे निधन झालेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा,’ अशी माहितीत्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. तसेच कृपया त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन देखील गोखले यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.