पुणे–पुण्यातील शाळा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, शाळा सुरू होणार असल्यातरी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती पाहता शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे सोपवला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून शाळा सुरुही झाल्या. पण, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आता पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
पवार म्हणाले, शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. इयत्ता पहिली ते ८ वीपर्यंतची शाळा दुपारी ४ पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते ८ वी अर्धा दिवस आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फिरत्या मोबाईल व्हॅनमधून लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, १० वी आणि १२ वी च्या परिक्षांबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, १० वी आणि १२ वी च्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. याबाबतचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील.