पुणे-वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळे आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र वगैरे म्हणून राज्य सरकारने राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णयाला महत्त्व दिल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.
राज्य सरकारने राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. या मुद्द्यावरून राज्य सरकारला भाजपने लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील जोरकसपणे बाजू मांडली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आता वाईन विक्री निर्णयाच्या मुद्द्यावरून विरोधकांना कानपिचक्या दिल्या आहेत. अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना टोला लगावला आहे.
अजित पवार यावेळी म्हणाले, या मुद्द्यावर सगळ्यांचा गैरसमज झाला आहे. शेवटी आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल, असे काही करणार नाही. सुविधा देणे वेगळे. मध्य प्रदेशने घरपोच दारू पोहोचवण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचे त्यांना लखलाभ, आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा आणि सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा टोला अजित पवार यांनी यावेळी बोलताना लगावला.