सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण


पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजेच ७५ व्या वर्षात आजपासून (१० फेब्रुवारी २०२३) पदार्पण झाले असून ७४ वा वर्धापन दिन आज मोठ्या थाटात साजरा केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली.

विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात या विद्यापीठाची ओळख ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ अशी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली होती त्या घटनेला १० फेब्रुवारी रोजी ७४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्धापन दिनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी विद्यापीठाच्या हिरवळीवर संध्याकाळी चार वाजता घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य भिकूजी (दादा)  इदाते हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ.कारभारी काळे असणार आहेत. यावेळी प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार हे देखील उपस्थित असतील.

अधिक वाचा  टीईटी घोटाळा : आणखी एकाला नाशिकमधून अटक :धक्कादायक माहिती समोर

विद्यापीठाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जीवनसाधना पुरस्कारांसोबतच युवा पुरस्कार आणि विविध शैक्षणिक पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी जीवन साधना पुरस्कार श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रमचे अजितकुमार सुराणा (शैक्षणिक, सामजिक व उद्योग), मधुकराव पिचड (सामाजिक व राजकीय), प्रसिद्ध कथक नृत्यांगना पंडिता मनिषा साठे(कला), अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील ( शैक्षणिक, सामाजिक),  विद्यापीठीय पातळीवरील आणि लोकसाहित्य अभ्यासक  प्रा.डॉ.प्रभाकर मांडे (शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक),  प्राज उद्योगसमूहाचे डॉ.प्रमोद चौधरी (उद्योग), विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.रघुनाथ शेवगांवकर (शैक्षणिक), विद्यापीठाच्या माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रा पवार (शैक्षणिक व सामाजिक) ,   स्वामी गोविंददेव गिरि (मानव्य विकास तत्वज्ञान) यांना जाहीर करण्यात आला आहे.

युवा पुरस्कारांमध्ये प्राजक्ता माळी (कला),  प्रीयेशा देशमुख (क्रीडा), डॉ.रणजित काशिद (संशोधन) आणि  डॉ.अमोल वाघमारे (सामाजिक कार्य) आदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love