पुणे – पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केला असून अखेर उमेदवारीची माळ सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक होते, परंतु, संग्राम देशमुख यांनी बाजी मारली आहे.
भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी होती. राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे (पुणे), माणिकराव चुयेकर (कोल्हापूर), संग्राम देशमुख (सांगली), शेखर तळेगावकर (सातारा) आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख (सोलापूर) यांची नावे स्पर्धेत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सुरवातीला सचिन पटवर्धन यांचे नाव आघाडीवर होते, नंतर राजेश पांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे आले होते. संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचे सांगली जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. दोन साखर कारखाने, सुत गिरण्या आणि शिक्षण संस्थाही आहेत.
या मतदार संघातून दोनदा आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आमदार झाले असले तरी त्यांच्यावर हा गड राखण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीचे आहे. त्यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.