पुणे-अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या, पुणे महानगर समितीतर्फे राबवण्यात आलेल्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियानात पुणे शहर व परिसरात १३ लाख कुटुंबाशी संपर्क करण्यात आला.
या गृहसंपर्क अभियानातंर्गत प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने एकूण ३५ हजार ३८२ राम सेवकांनी सहभाग घेतला. त्यात १० हजार १७८ महिलांचा सहभाग आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शहरांमध्ये विविध वस्त्यांमध्ये १ हजार २०० पेक्षा अधिक छोट्या बैठका घेतल्या गेल्या. १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत संपूर्ण पुणे शहर व परिसरात हे गृहसंपर्क अभियान राबवण्यात आले.
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या पुणे महानगर समितीचे संयोजक प्रसाद लवळेकर, सहसंयोजक अभिजित बर्वे, विश्व हिंदू परिषद पुणे महानगर पूर्व भाग मंत्री धनंजय गायकवाड यांनी ही माहिती दिली.यावेळी पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर,विश्वास मणेरे विहिंप पश्चिम भाग सह मंत्री दिनेश लाड यांची उपस्थिती होती.या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासतर्फे, पुणे महानगर समितीने हे अभियान आयोजित केले होते.
समाजातील सर्व स्तरातील लोक मोठ्या संख्येने अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिराच्या स्वप्नपूर्तीनिमित्ताने या अभियानात व जल्लोषात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे चित्र संपूर्ण पुणे महानगरात पाहायला मिळते आहे.अभियानादरम्यान याची वेळोवेळी प्रचिती आल्याचे प्रसाद लवळेकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
याचाच परिपाक म्हणून सोमवार, २२ जानेवारी रोजी समाजातील सर्व नागरिक, गृहनिर्माण संस्था, मंदिरे, गणेश व नवरात्र मंडळे, संस्था, संघटना व विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून देखील पूर्ण पुणे महानगरात सुमारे सात हजारांहून अधिक उत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानात प्रत्येक कुटुंबात जावून राम भक्तांनी शुभकार्याचे निमंत्रण दिले. अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराचा फोटो दिला. तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे, शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कुटुंब संपर्काच्या वेळी अनेक कुटुंबांनी सर्व राम भक्तांचे भरभरून स्वागत केले. त्यांना धन्यवाद दिले. अनेक वेळा त्या अक्षता देवासमोर ठेवून भजन व आरती ही करण्यात आल्याचे असंख्य सुखद अनुभव रामभक्तांना आले.
१ जानेवारी २४ रोजी आरंभलेल्या या अभियानात मंदिर, गुरुद्वारा, जैन मुनि, बौद्ध भिख्खू यांना अक्षता देऊन करण्यात आली. सुरुवातीला उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार अक्षता देण्यात आल्या. समाजातील विविध थरातील मान्यवरांना प्रशासकीय, लष्करी तसेच पोलीस अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, खेळाडू यांना निमंत्रणे देण्यात आली.
अयोध्या येथे होणाऱ्या २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला पुणे आणि परिसरातील विविध ५० पेक्षा अधिक मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली. त्यात माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, साधू वासवानी मिशनच्या दीदी कृष्णा कुमारीजी, ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय भटकर, एनसीएलचे संचालक डॉ. लेले, निवृत्त लष्करा प्रमुख जनरल मनोज नरवणे, एअर मार्शल पी. व्ही. नाईक(निवृत्त), उद्योग जगतातील अभय फिरोदिया, बाबासाहेब कल्याणी, प्रमोद चौधरी, श्री. सतीश मेहता, आनंद देशपांडे, आदर पुनावाला, संजय किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, प्रकाश धारीवाल, व अनुराधा राव माध्यम क्षेत्रातील अभिजीत पवार, योगेश जाधव, पराग करंदीकर,
सौ. शेफाली वैद्य, खेळाडू तेजस्विनी सावंत,अंजली भागवत,आनंद माडगूळकर, श्रीधर फडके, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे, सौ. ज्योती पठानीया, शिक्षण क्षेत्रात निवृत्त कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर,डॉ.भूषण पटवर्धन, डॉ. पी.डी.पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार आदी मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.
पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पुणे शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या आनंदोत्सवात पुणेकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..
> २२ जानेवारी रोजी शहरभरात ६ हजारांहून अधिक अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन
> १ हजार ७०० हून अधिक मंदिरात व मंडळांमध्ये उत्सव
> सुमारे तीन हजार गृहनिर्माण सोसायट्यांमधून विविध कार्यक्रम
> पुणे शहरात १ हजार ५०० हून अधिक ठिकाणी दीपोत्सव होणार, त्या अंतर्गत वाघेश्वर मंदिर, वाघोली येथे ५१ हजार दीप प्रज्वलित केले जाणार आहेत.
> मंदिरांमध्ये व मंडळांमध्ये महाप्रसाद, शोभायात्रा, गीत रामायण, भजन, रामरक्षा, रामपाठ, रामनाम जप, आरती, रांगोळी, व नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
> संस्कार भारती नृत्यविधा व विविध नृत्य अकादमीतर्फे मिळून मंदिरांमध्ये २५ हून अधिक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम
> पतित पावन संघटना १ लाख लाडू वाटणार
> येरवडा कारागृहात देखील कार्यक्रमाचे आयोजन
> प्रशासन, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, अनाथाश्रम, देवादासी यांना मिठाई वाटप, व आनंदोत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न
> मगरपट्टासिटीसारख्या अन्य टाऊनशीपमध्ये देखील भव्य आनंदोत्सवाचे आयोजन
> वाघोलीत तीन दिवस अखंड रामनाम जपाचे आयोजन
> शहराभरात विविध संस्था, संघटनांकडून आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरांचे आयोजन