रहिमतपूर (जि. सातारा)(प्रतिनिधि)- शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत(Ayodhya) भव्य राममंदिरामध्ये (Ram Temple) रामलल्लाच्या(Ramlalla) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्त संपूर्ण देशात दिवाळी साजरी करावी आणि मंदिरांची स्वच्छता करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला रहिमतपूरकरांनी( Rahimatpur) भरभरून साद दिली आहे. त्यामुळेच येथे सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन(Rahimatpur’s unique vision of interfaith equality and social unity) घडले आहे. येथील प्राचीन राम मंदिर(Ancient Ram Temple, जैन मंदिर(Jain Temple) आणि मस्जिद(Mosque) यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नाशिक दौऱ्यात काळाराममंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी काळाराम मंदिराच्या आवारात स्वतः स्वच्छता केली. याचनिमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये मकर संक्रांती (१४ जानेवारी) ते अयोध्या सोहळा (२२ जानेवारी) या काळात स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. यास रहिमतपूरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रहिमतपूरचे मूळ रहिवासी आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्वच्छता मोहिमेविषयी चर्चा केली. त्यानुसार, शहरातील प्राचिन अशा श्रीराम मंदिर, जैन मंदिर आणि मस्जिद या तिन्ही प्रार्थनास्थळांच्या आवारात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. उत्स्फुर्तपणे झालेल्या या कार्यामुळे तिन्ही स्थळांचा आवार अतिशय चकाचक झाला आहे. म्हणूनच तेथे सध्या प्रसन्नतेची अनुभूती भाविकांना येत आहे.
श्रीराम मंदिर
हे श्रीराम मंदिर १५० वर्षे जुने आहे. याठिकाणी काळ्या पाषाणातील प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. साधारण ३ हजार चौरस फुट मंदिराचा परिसर आहे. काळ्या दगडातील हे मंदिर आहे. शेंडे घराण्याकडून या मंदिराचा जीर्णौद्धार करण्यात आला आहे. श्रीराम सेवा मंडळाच्या संतोष नाईक, राजू कनसाळे, जगन्नाथ तारखे, सचिन भंडारी आदींच्या गटाने मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.
जैन मंदिर
साधारण १०० वर्षे जुने हे जैन मंदिर आहे. या मंदिराचा परिसर २५०० ते ३००० चौरस फुटाचा आहे. येथे भगवान महावीरांची अतिशय प्रसन्न मूर्ती आहे. मंदिराची शिल्पकला आणि बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिर विश्वस्त आणि भाविकांनी याठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. त्यात डॉ. अशोक गांधी, गणेश गुंडेशा, पराग ओसवाल, श्रेणीक शहा, प्रताप गांधी, भारत शहा आदींचा त्यात समावेश आहे.
मस्जिद व दर्गा
तब्बल ४०० वर्षांहून अधिक प्राचिन अशी मस्जिद आणि दर्गा आहे. एकाच मोठ्या दगडी चौथऱ्यावर हे दोन्ही आहेत. दगडी कारंजा, चार मनोरे हे येथील आकर्षण आहे. मशिदीमध्ये फारशी शिलालेख आहेत. तर मशिदीची शिल्पकला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला साद देत याठिकाणी इमाम शरीफ मुल्ला यांच्यासह ईस्माईल मुल्ला, सादिक मुल्ला, मन्सूर मुल्ला आदींनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.सौहार्दाचा आदर्श
शहरातील तिन्ही प्रार्थनास्थळांवर स्वच्छता राबवून सौहार्दाचे दर्शन घडविण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला केवळ धार्मिक बाब न समजता त्यातून ऐक्याचा संदेश रहिमतपूरकरांनी दिल्याने त्याची पंचक्रोशीतच चर्चा घडत आहे. या उपक्रमामुळे सर्वांनाच मनस्वी आनंद मिळाला आणि तिन्ही ठिकाणचे वातावरण अतिशय प्रसन्न झाल्याची अनुभूती येत आहे, असे डॉ. शेंडे यांनी म्हटले आहे.
—
रहिमतपूर म्हणजे खऱ्या अर्थाने भारत. भाषा अनेक भावना एक. विचार अनेक विषय एक. राग अनेक राम एक. म्हणूनच भारतात जे कुठे घडले नाही ते येथे घडले.
– डॉ. राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ