प्रियकर – प्रियेसीचे भांडण सोडवण्याकरता मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खून

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि) : प्रियकर व प्रियेसी यांच्यात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात प्रियेसीने तिच्या मामांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर प्रियेसीचे मामा आणि प्रियकर यांच्यात सुरु झालेली भांडणे सोडविण्याकरिता मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शरीरावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार दत्तवाडी परिसरातील लोकमान्यनगर याठिकाणी शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

प्रसाद गणेश गायकवाड (वय-२१,रा.दत्तवाडी,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीचा प्रियकर राहुल शांताराम वाळंज (२२) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधीत तरुणी पोर्णिमा बरगुडे (२२), तिचे मामा तुकाराम दारवटकर (४१), माऊली दारवटकर (३८) यांच्यासह इतर पाच ते सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोर्णीमा बरगुडे ही एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने विक्री करणाऱ्या सराफ दुकानात कामास आहे तर तिचा प्रियकर राहुल वाळंज याचे नवी पेठेत रेडीमेड कपडे विक्रीचे पार्टनरशीप मध्ये दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याचे सुमारास पोर्णिमा हिला लोकमान्यनगर येथील घरी सोडण्याकरिता दुकानातील मॅनेजर दुचाकीवर आला होता. तिला सोडून मॅनेजर पुन्हा घरी परतत असल्याचे पाहून राहुल वाळंज याला संशय आला आणि त्याने त्यास थांबवून त्याची विचारणा सुरु करत वाद घालण्यास सुरुवात केली. पोर्णीमा हिच्यासोबत तु का फिरतोस असे म्हणत त्याने भांडणे सुरु केल्याने पोर्णिमा हिने तिचे मामा तुकाराम दारवटकर व माऊली दारवटकर यांना संबंधित जागी बोलावून घेतले.

मामा त्यांच्या पाच ते सहा साथीदारांसाह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राहुल वाळंज व त्याचा मित्र राज पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. राज पवार याने तुकाराम दारवटकर यांना धरुन ठेवले असल्याचे पाहून त्याठिकाणावरुन जात असलेल्या गणेश ऊर्फ प्रसाद गायकवाड याने ही भांडणे पाहून ती मध्यस्थी करण्यासाठी आला. त्यावेळी तुकाराम दारवटकर याने त्याच्या कमरेला लावलेली दीडफूटाची तलवार बाहेर काढून ती गायकवाड याच्या डाव्या बाजूच्या छातीचे बरगडीत भोसकली. या हल्लयामुळे गणेश गायकवाड जखमी होऊन जागेवर पडला आणि त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच, तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेवून ससून रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला. आरोपी तुकाराम दारवटकर हा प्रिटिंग प्रेस मध्ये काम करतो तर खून झालेला गणेश गायकवाड हा विवाहित होता. या खुनाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *