पुणे(प्रतिनिधि)–स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गिनीज जागतिक विश्वविक्रम ( Guinness World Records) प्रस्थापित करण्याचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि इतर सर्व घटक संस्था महाविद्यालये व परिसंस्था आणि नागरिकांच्या सहभागातून किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा (Largest Online Album of People Holding National Flag) गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे.
युवा संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी तिरंगा ध्वज हातात धरून काढलेले स्वतःचे व इतरांचे छायाचित्र (फोटो) https://spputiranga.in/photoupload/ या किंवा https://forms.gle/juJt9rtgnpo5fgZh9 या लिंकवर टाकावे, आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
लिंकवर फोटो अपलोड करताना घ्यावयाची काळजी व सूचना
१. एका फोटोत एकच व्यक्ती असावी. शक्यतो झेंडा दोन्ही हातानी छातीसमोर
पकडून फोटो काढावा.
२. सेल्फी स्वरूपातील फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
३. चेहऱ्यावर स्वच्छ प्रकाशझोत असावा. फोटो काढताना उभे राहिल्यावर मागे स्वच्छ भिंत अथवा पडदा असावा. निसर्ग अथवा भिंतीवरील फोटो, पुतळे, सूचना अथवा नावाचे फलक असल्यास फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
४. एका व्यक्तीने वरील लिंकवरील स्वतःचा फक्त एकदाच फोटो अपलोड करावा.
फोटोचे आकारमान ६ ते ७ एमबी इतकेच असावे.
खाली दिलेला QR Code स्कॅन करूनही सहभागी होता येईल .

युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार देवेन्द्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात देशभरात होत असून देशाच्या प्रत्येक नागरिकाने राष्ट्राभिमान व राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलित होण्यासाठी भारताचा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्याची ऐतिहासिक मोहीम केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केली आहे. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अतिशय उत्साहाने आणि नावीन्यपूर्णतेने सहभागी होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या निमित्ताने युवा संकल्प अभियानाची सुरुवात करत असून या संकल्पात विद्यापीठाचे ६ लाखांहून अधिक आजी माजी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभागी होतील, असे आवाहन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व घटकसंस्था, महाविद्यालये, परिसंथा, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दत्तक गावांमध्ये हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला आहे. ७५० हून अधिक महाविद्यालये, ६५,००० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३००० हून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ५ लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने पुणे, अहमदनगर, व नाशिक या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्राचार्य यांच्या जिल्हानिहाय आयोजन व सहविचार सभा आयोजित केल्या गेल्या आणि या सभांना अत्यंत उस्फूर्त व संख्यात्मक प्रतिसाद मिळाला आहे.