पुणे—विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलीस दलातील बदल्यांवरून गृहमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारबाबत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असताना आता पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जाधव नाराज असून त्यांनी कारण नसताना बदली होत असेल तर मला इच्छा मरण द्यावे, असं म्हटलं आहे.
माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गृहखात्यातील अर्थकारणामुळेच हा प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप करत मला इच्छा मरणाची परवानगी न दिल्यास परवानगी असल्याचं गृहित धरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.