पुणे- देशासह जगभरात गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मोठे संकट उभे ठाकले होते. अशा आपत्तीच्या काळात झोकून देऊन सेवाकार्य उभे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे. कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात असेच लक्षणीय सेवाकार्य केल्याची माहिती रा. स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षी साधारण २२ मार्चपासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक मोठ्या क्षमतेने कोरोना मदतकार्यात उतरले होते. स्वयंसेवकांनी देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून ९२६५६ ठिकाणी सेवाकार्य केले. ५ लाख ६० हजार स्वयंसेवक या कार्यात सहभागी झाले होते. या काळात देशभरात जीवनावश्यक ७३ लाख वस्तूंचे वाटप करण्यात आले, तर साडेचार कोटी नागरिकांना भोजन पॅकेटचे वितरण करण्यात आले. तसेच ९० लाख मास्कचे वितरण आणि २० लाख प्रवाश्यांना मदत करण्यात आली. भटके-विमुक्त समाजातील २ लाख ५० हजार नागरिकांना मदत करण्यात आली. ६० हजार युनिट रक्तदान करण्यात आले, असेही डॉ. दबडघाव यांनी दिली.
गेल्या वर्षी जगात सर्वच कार्य ठप्प झाले होते. संघ ही त्याला अपवाद नव्हता. त्यामुळे संघाच्या शाखांच्या संख्येत काही प्रमाणात घट दिसून आली, पण दुसरीकडे संघस्वयंसेवक मात्र झोकून देऊन सेवाकार्यात जुंपले होते. शाखा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून, लवकरच त्यांच्या संख्येत वाढ दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची निवड
दर तीन वर्षांनी रा. स्व. संघात निवडणूक होते. जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावरील मा. संघचालकांपासून सर्व केंद्रीय प्रतिनिधी, तसेच सरकार्यवाह यांची या पद्धतीने निवड केली जाते. संघाच्या घटनेनुसार निवडणूक होऊन संघाचे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली. मूळचे कर्नाटकातील असलेले दत्तात्रेय होसबळे तेराव्या वर्षी संघ स्वयंसेवक बनले आणि १९७२ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. २००३ मध्ये त्यांच्याकडे संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख अशी जबाबदारी आली तर २००९ पासून सह सरकार्यवाह म्हणून त्यांच्याकडे दायित्व होते. सामाजिक कार्याचा भाग म्हणून अमेरिका, युरोपसहित जगातील अनेक देशांना त्यांनी भेट दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९ व २० मार्च रोजी बंगळुरू येथे झाली. या प्रतिनिधी सभेने विविध ठराव संमत केले. त्यात श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माण हा देशाच्या आंतरिक शक्तीचा आविष्कार असल्याचे म्हटले असून, एक राष्ट्र- एक समाज म्हणून एकजुटीने केलेल्या कोरोनाच्या मुकाबल्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन करण्यात आले आहे. संपूर्ण देशाने एकजुटीने निर्धारित नियमांचे पालन केले. कोरोना तपासण्या व रुग्णसेवेच्या कार्यात संलग्न सर्व डॉक्टर्स, नर्स, अन्य आरोग्यकर्मी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य चालू ठेवले. सुरक्षा दले, शासकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, तसेच वित्तीय संस्थांतील कर्मचाऱ्यांसहित संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित अनेक समुहांच्या सक्रियतेमुळे अशा आव्हानात्मक काळात दैनंदिन जीवनाचा प्रवाह अबाधित चालू राहू शकला. ही सारी कामे आणि विविध शासकीय विभागांद्वारे केले गेलेले समन्वित प्रयत्न, तसेच ‘‘श्रमिक ट्रेन’’, ‘‘वंदे भारत मिशन’’ आणि सध्या सुरू असलेले ‘‘लसीकरण अभियान’’ प्रशंसनीय आहे, असे दुसऱ्या ठरावात म्हटले आहे.
यावेळी रा.स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी पुणे महानगरातील सेवाकार्य विषयक माहिती दिली. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.पुणे महानगर सह्प्रचार प्रमुख नरेंद्र जोशी यांनी आभार मानले.