Rashtriya Swayamsevak Sangh Janaklyan Samiti has selected two organizations namely 'Seva Bharti Dakshina Tamilnadu' and 'Bharatiya Vikharan Kendram, Kerala' for this year's 'Pujniya Sriguruji Award'.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भारती दक्षिण तमिळनाडू’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम, केरळ’ या दोन संस्थांची यंदाच्या ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कारा’साठी निवड

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भारती दक्षिण तमिळनाडू’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम, केरळ’ या दोन संस्थांची यंदाच्या ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. पुण्यात ३ मार्च रोजी होणार्‍या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा २९ वे वर्ष आहे. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. संस्थेचे कार्यवाह राजन गोर्‍हे, संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सेवाकार्य प्रमुख शैलेंद्र बोरकर आणि ‘सेवा भारती’ पश्चिम महाराष्ट्र या संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस  यावेळी उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे.पूर्व लोकसभाध्यक्ष सुमित्राताई महाजन पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर होईल.

‘सेवा भारती’ ही संस्था दक्षिण तमिळनाडूतील ३१ जिल्ह्यांमध्ये सेवेच्या क्षेत्रात काम करत आहे. गेल्या चौतीस वर्षांपासून हे काम सुरू असून संस्थेतर्फे ३१ जिल्ह्यांमध्ये ५४१ ठिकाणी ८ हजारांहून अधिक सेवाकार्ये चालवली जात आहेत. शहरी, ग्रामीण तसेच वनवासी भागात ही सेवाकार्ये सुरू असून प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक क्षेत्रात संस्थेची सेवाकार्ये चालतात. रुग्णसेवा, संस्कारकेंद्र, दिव्यांग सेवा, अनाथालये, वृद्धाश्रम, परित्यक्तागृहे, गोसेवा, अन्नछत्र, महिला बचत गट, संगणक प्रशिक्षण, कुटुंब प्रबोधन, भजन मंडळी, दीपपूजा, मोबाईल ग्रंथालये, रस्ते स्वच्छता आदी अनेकविध प्रकारची सेवाकार्ये संस्थेतर्फे सुरू आहेत. ही सर्व सेवाकार्ये समाजाच्या दातृत्वशक्तीवर चालवली जातात. यंदा सेवा क्षेत्रासाठीचा पुरस्कार ‘सेवा भारती’ या संस्थेला प्रदान केला जाईल.

केरळमधील तिरुवअनंतपूरम येथे १९८२ साली स्थापन झालेल्या ‘भारतीय विचार केंद्रम’ या संस्थेतर्फे प्रामुख्याने प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा जतनाचे तसेच भारतीय जीवनमूल्ये आणि जीवनदर्शनाचा प्रचार-प्रसार हे कार्य चालते. भारतीय मूलभूत विषयांवर संशोधन करून त्याचा बुद्धिवंतांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये प्रसार, विद्वानांच्या, अभ्यासकांच्या व्याख्यानांचे आयोजन, ग्रंथांचे प्रकाशन, संशोधनपत्रिकांचे प्रकाशन, परिषदा, परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन आदी कामेही संस्थेतर्फे सुरू आहेत. ‘प्रगती’ या मल्याळम आणि इंग्रजीतील त्रैमासिकाचे प्रकाशनही भारतीय विचार केंद्रम या संस्थेतर्फे केले जाते. या संस्थेला यंदा वाड्मय क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रदान केला जाईल.

या दोन्ही संस्थांचे त्यांच्या क्षेत्रातील कार्य लक्षणीय असून त्यांच्या या कार्याचा सन्मान ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान करून केला जाईल. पुणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या संस्थांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन ‘जनकल्याण समिती’तर्फे करण्यात आले आहे.

जनकल्याण समितीची सेवाकार्ये

जनकल्याण समितीतर्फे महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पूर्वांचल विकास, कृषी विकास आणि पर्यावरण या सात प्रमुख क्षेत्रात १८७० सेवाकार्ये सुरू आहेत. समितीचे पुरुष, महिला मिळून चार हजार कार्यकर्ते स्वयंसेवी वृत्तीने ही सेवाकार्ये चालवत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *